बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 19:03 IST2020-12-26T19:00:21+5:302020-12-26T19:03:03+5:30
या धक्कादायक प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

बापरे ! बिलोलीत मृत कर्मचाऱ्यांना दिले ग्रामपंचायत निवडणुकीचे काम
बिलोली : तालुक्यात ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी बुथ निहाय निवडणुक कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात दोन वर्षांपूर्वी मृत कर्मचाऱ्यांना सुद्धा नियुक्ती देण्यात आल्याने गटशिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार पुढे आला. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.
बिलोली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या २०४ प्रभागातील ५५६ सदस्यांच्या निवडीसाठी ९४ हजार ३०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या कामकाजासाठी शैक्षणिक, निवडणुक, महसुलसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. त्यासाठी ८८० कर्मचा-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शहरालगत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात निवडणुक विभागाकडुन प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जात आहे. मात्र, या यादीत माध्यमिक शाळेवरील दोन मृत शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकाराने पुन्हा एकदा गटशिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गटशिक्षण विभागाने तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी शिक्षकांच्या याद्या दिल्या आहेत. त्याप्रमाणे कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात मृत कर्मचाऱ्यांची नावे आढळून आल्याने त्यांच्या जागी अन्य कर्मचा-यांना नियुक्त्या देण्यात येतील.
- डॉ.ओमप्रकाश गोंड, निवडणुक अधिकारी बिलोली