कोरोना संकटात अनाथ मुलांच्या मदतीला धावले शासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:48+5:302021-05-27T04:19:48+5:30
मार्च, २०२० पासून उद्भवलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८६८ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये ...

कोरोना संकटात अनाथ मुलांच्या मदतीला धावले शासन
मार्च, २०२० पासून उद्भवलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८६८ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये अनेक बालकांना आपले माता-पिता गमवावे लागले आहेत. या मुलांचा मुख्य आधारच कोरोनाने हिरावला आहे. त्यांना आता शासन स्तरावरून मदत देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ० ते १८ वयोगटांतील अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. या मुलांची महिला व बालकल्याण विभागाकडे गृहभेटीद्वारे चौकशी केली जात आहे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे.
चौकट------------
शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत यापूर्वी ४२५ रुपये मदत मिळत होती. ६ एप्रिलच्या नव्या आदेशानुसार, ती मदत आता १,१०० रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. कोरोनात आई किंवा वडील यातील एकाचा मृत्यू झाल्यास ही मदत केली जाणार आहे. जिल्ह्यात अशा मुलांची संख्या १८६ आहे. पूर्वी १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा शोध घेतला जात होता, आता त्यात २३ वर्षांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
चौकट----------------
कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना आवश्यक ती मदत शासनाकडून केली जाणार आहे. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था, शिक्षण, कायदेविषयक मदत या सर्व बाबींचा समावेश आहे. याबाबत अद्याप सुस्पष्ट धोरण ठरले नसले, तरीही अनाथ झालेल्या मुलांना एकटे झाल्याची भावना निर्माण होऊ नये, याचा प्रयत्न शासन स्तरावर केला जात आहे.
कोट-----------
जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या अडचणीत सापडलेल्या बालकांचा शोध सुरू आहे. टास्क फोर्सचीही स्थापना झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. अनाथ मुलांच्या राहण्यासाठी व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे.
- रेखा काळम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नांदेड.