गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे माणूसकेंद्रित - डॉ. यशवंत मनोहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:49+5:302021-05-28T04:14:49+5:30
अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ...

गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे माणूसकेंद्रित - डॉ. यशवंत मनोहर
अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो तसेच संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आणि डॉ. जे.टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मनोहर म्हणाले की, बुद्ध हा जगातील पहिला शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी सत्याला शोधून काढलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्माची पुनर्रचना केली आणि जगमान्य झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्माची पुनर्रचना वैज्ञानिक सत्यावर आधारित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता बुद्धासारखे विश्वमय होत आहेत. बुद्ध हा जगाचा पहिला तत्त्वज्ञानी आहे.
माणसांनी ईश्वराशी कसे वागावे ही नैतिकता नव्हे. ती निरर्थकता आहे. तर माणसांनी माणसांशी कसं वागावं हीच खरी नैतिकता आहे. भौतिकवादाला नैतिकवाद व नैतिकवादाला भौतिकवाद करणारं हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. चैतन्यवादी तत्त्वज्ञानातील फोलपणा बुद्धाने अधोरेखित केला. बुद्धाचं तत्त्वज्ञान निरीश्वरवादी आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे अंतिम सत्याचा शाेध घेणारे आहे. आपण जे शोधलं ते नवं तत्त्वज्ञान परंपरेच्या जोखडाखाली जगणारे लोक स्वीकारतील काय? बुद्धाच्या मनात ‘विषाद’दाटून आला. लोकांना सांगू की नको, असा प्रश्न बुद्धासही पडला. पण हे सर्वसमान्यांच्या हिताचं तत्त्वज्ञान लोकांना सांगितलंच पाहिजे, या निष्कर्षाप्रत पोहोचून बुद्धाने जगाचा उद्धार केला, असे डाॅ. मनोहर म्हणाले. यशस्वीतेसाठी अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले.