जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची येथील कुसुम सभागृहात सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी जिल्हाभरातून आलेल्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे कुसुम सभागृह तुडुंब भरले होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुका ह्या काही पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत. तरीही विशिष्ट पक्षाच्या विचारांनी प्रभावित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढविली होती. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस विचारांचे पॅनल विजयी झाले असून महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी चांगले यश मिळविले आहे.
विजयी झालेल्या उमेदवारांचे कौतुक करतानाच गटातटांचे राजकारण बंद करून गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. तब्बल तीन तास चाललेल्या या सत्कार सोहळ्यास माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, विधान परिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार हणमंतराव पाटील-बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील, रावणगावकर, आदींची उपस्थिती होती.