Four trains from Nanded division are canceled due to line block | लाईन ब्लॉकमुळे नांदेड विभागातील चार रेल्वेगाड्या रद्द
लाईन ब्लॉकमुळे नांदेड विभागातील चार रेल्वेगाड्या रद्द

नांदेड : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणाऱ्या काही गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़ 

नांदेड विभागाच्यावतीने रद्द झालेल्या गाड्यासंदर्भात दिलेल्या माहितीनूसार गाडी नं. ५१४२२ निझामाबाद ते पुणे १५ जून ते ५ जुलै या कालावधीत रद्द करण्यात आली आहे़ त्याचबरोबर गाडी नं. ५१४३४ पंढरपूर ते निझामाबाद १५ जुलै ते २५ सप्टेंबर या कालावधीत रद्द राहील़  गाडी नं. ५१४२१ पुणे ते निझामाबाद १५ जून ते ६ जुलै आणि १५ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे़ गाडी नं. ५१४३३ निझामाबाद ते पंढरपूर १६ जून ते ७ जुलै आणि १६ जुलै ते २७ सप्टेंबर या कालावधीत रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ नांदेड विभागातून धावणाऱ्या तीन गाड्या काही कालावधीसाठी अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़

पंढरपूर यात्रेवेळी दिलासा
सोलापूर विभागातील इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत़ परंतु, पंढपूर येथील आषाढी एकादशी यात्रा कालावधी यातून वगळण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होणार नाही़ १२ जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा आहे़ त्यामुळे ८ जुलै ते १४ जुलैदरम्यान सर्व गाड्या निर्धारित वेळेवर धावतील़ या कालावधीत कुठलीही गाडी रद्द केली जाणार नाही़ यामुळे पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Web Title: Four trains from Nanded division are canceled due to line block
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.