पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय अभिवक्ता संघाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:01 IST2021-01-23T17:44:09+5:302021-01-23T18:01:20+5:30
Rape n Murder of Minor Girl भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे २० रोजी पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात

पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय अभिवक्ता संघाचा निर्णय
भोकर (जि. नांदेड) : तालुक्यातील दिवशी बु. येथे झालेल्या पाच वर्षीय बालिकेच्या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी २२ रोजी भोकर बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाने दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव येथील अभिवक्ता संघाने घेतला.
तालुक्यातील दिवशी बु. येथे २० रोजी पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडल्यानंतर विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. सदरील घटनेतील आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. घटनेची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी व आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, या मागणीसाठी दिवशी बु. येथील ग्रामस्थांनी २२ रोजी भोकर बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनास भाजप महिला आघाडी, मुन्नेरवारलू समाज संघटना, ऑल इंडिया पॅँथर सेना आदींसह विविध सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख रस्त्याने वेगवेगळी रॅली काढली होती. बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी व लहानसहान विक्रेत्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
वकील संघातर्फे निषेध
सदरील घटनेचा भोकर अभिवक्ता संघाने निषेध करून आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव घेतला. तसेच घटनेच्या निषेधार्थ भोकर बंदच्या आवाहनामुळे २२ रोजी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही.