माहुरात चक्क पाण्याच्या पाईपलाईनवर उभी राहतेय अग्निशमन इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:45 IST2018-04-25T20:45:50+5:302018-04-25T20:45:50+5:30
हरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़

माहुरात चक्क पाण्याच्या पाईपलाईनवर उभी राहतेय अग्निशमन इमारत
- इलियास बावाणी
श्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) : शहरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़
शासनाकडून मिळालेल्या निधीतून अग्निशमन वाहन खरेदी करून एक वर्ष झाले मात्र वाहनांची अद्यापही पासिंग झाली नाही. प्रशिक्षित चालक, फायरमनची नेमणूक नाही़ वाहन तसेच वापरण्यात येत आहे़ शासनाकडून ९० लाख १२ हजार रुपये निधी मंजूर झाल्याने पाणीपुरवठा परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामास आ़ प्रदीप नाईक यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर २०१७ रोजी उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली होती़
गेल्या ३० वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निर्माणनिधी इमारतीजवळ पाण्याची टाकी बांधून पाईपलाईन टाकण्यात आली़ या पाईपलाईनवरून आजमितीस पैनगंगा नदीवरून पाणी येत आहे़ ही पाईपलाईन निर्माणाधीन इमारतीच्या मध्यभागी आल्याने इमारतीच्या खांबाची जागा बदलण्यात आल्याने खांब नको त्या ठिकाणी वाकडे झाल्याने अंदाजपत्रक चुकवून काम होत असल्याचा प्रकार सुरु आहे.
कालबाह्य पाईपलाईन या इमारतीखालून गेल्याने लिकेज किंवा अर्धवट काम झाल्यानंतर काम निघाल्यास इमारत तोडून मेंटनन्स करणार काय? जुनी पाईपलाईन इमारतीच्या बाजूने जागा असताना का बदलली नाही? पाईप व इतर साहित्य असताना बाजूने पाईपलाईन का टाकली नाही? तसेच १० हजारांच्या खर्चासाठी स्ट्रक्चर बदलणारे ऩप़चे मुख्याधिकारी, अभियंते व कर्मचारी या कामात आणखी किती अनियमितता करतील याचा नेम नाही़ अनेक निर्माणाधीन इमारती कोसळतात़ त्याप्रमाणे येथे प्रकार घडल्यास नुकसान कोणाचे होणार?
निर्माणाधीन इमारतीच्या खाली असलेली पाईपलाईन काढून बाजूने टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे़ वेड्यावाकड्या पिल्लरवर ९० लाख रुपयांची इमारत तग धरेल काय? निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
काम परवानगीनेच होत आहे
इमारतीखाली असलेली पाईपलाईन कालबाह्य झाली असून लवकरच नवीन पाईपलाईन होणार आहे़ तसेच त्या पाईपलाईनचे स्पेअर पार्ट मिळत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीने हे काम होत आहे - प्रतीक नाईक, प्रभारी नगर अभियंता, नगरपंचायत, माहूर