ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 13:27 IST2022-02-03T13:26:15+5:302022-02-03T13:27:32+5:30
शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ
- शिवराज बिचेवार
नांदेड- कोरोनामुळे गेले दोन वर्षे ऑफलाइन अभ्यासक्रम घेण्यात आला. त्यात जानेवारीमध्ये काही दिवसांसाठी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ओमायक्रॉनमुळे त्या बंद केल्या होत्या. परंतु शाळा सुरु होताच ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केला, याची चाचपणी घेण्यासाठी चौथीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु हातात पेपर पडताच चौथीतील मुलाला घाम फुटला आणि तो अत्यवस्थ झाला.
शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या घोळामुळे शैक्षणिक क्षेत्राचे वाटोळे झाले आहे. बारावीचा तर ८० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन घेण्यात आला अन् परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची घोषणा होताच संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. चिमुकल्यांच्या मानसिकतेवर त्यापेक्षा वाईट परिणाम झाला आहे. चौथीतील रुद्र (नाव बदलले) हा शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी पेपर सोडविण्यास त्याला सांगितले. परंतु, पेपर हातात पडताच इतर काही मुले रडायला लागली, तर रुद्रला दरदरुन घाम येऊन तो अत्यवस्थ झाला. लगेच पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयातून घरी आल्यानंतरही तो शाळेत जाण्याच्या नावानेच थरथर कापत होता. सारखे बडबडायचा, मी नापास होणार, मला काहीच येत नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या पालकांनी मानसोपचारतज्ज्ञाकडे त्याच्यावर उपचार सुरु केले. औषधोपचारानंतर त्याची मानसिकता बदलत आहे. परंतु, अद्यापही अभ्यास अन् शाळा हे विषय काढताच तो भीतीच्या सावटाखाली जातो. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचे गंभीर परिणाम आता दिसून येत आहेत.
ऑनलाइनमुळे संवाद हरविला
ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद हरवला. शाळेत शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण वर्गासमोर द्यावे लागत होते. त्यातून विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होत होती. चुकले तर मुले हसत होती. त्यामुळे मनातील भीती कमी होत होती. परंतु, ऑनलाइनमुळे या सर्वांना ब्रेक बसला. दोन तास बसून पेपर सोडविण्याची सवयही मोडली. त्यामुळे जसजशा शाळा ऑफलाइन होतील, तसतसे मानसिकतेतील बदल पुढे येतील. - डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ
खेळतो पण शाळेच्या नावानेच घाबरतो
रुद्र हा गेले दोन वर्षे ऑनलाइन अभ्यासक्रम करीत होता. वाट्टेल तेव्हा दांडी मारत होता. परंतु, आता शाळेत जाण्याचे नाव काढले तरी, एकदम घाबरुन जातो, रडायला लागतो. मी नापास होणार, असे बडबडतो. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. - रुद्रचे पालक