शेतकऱ्याचा न्याराच जिव्हाळा; कोंबड्याला अंतिम निरोप देण्यासाठी वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 19:53 IST2021-07-26T19:46:54+5:302021-07-26T19:53:11+5:30
ग्रामीण भागात माणसासोबतच प्राण्यांनाही जीवापाड जपले जाते याचा प्रत्यय नेहमी येतो.

शेतकऱ्याचा न्याराच जिव्हाळा; कोंबड्याला अंतिम निरोप देण्यासाठी वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा
नांदेड- मानवाला प्राण्यांचा लळा असतो. त्यातच शेतकरी आणि प्राण्यांचे नाते हे रक्ताच्या नात्या पलीकडचे असते. शेतकरी आपल्याजवळील प्राण्यांना जीवापाड जपतो. असाच काहीसा प्रकार मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ येथे घडला. तब्बल दहा वर्ष शेतकर्यासोबत असलेल्या राजा नावाच्या कोंबड्याचा मांजरीच्या हल्यात मृत्यू झाला. ग्रामस्थांचा लाडक्या असलेल्या या कोंबड्याला अंतिम निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क वाजत-गाजत त्याची अंत्ययात्रा काढली.
कोरोनामुळे सध्या रक्ताची नाती दुरावली आहेत. त्यामुळे आप्तेष्टांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीलाही कुणी जाण्यास धजावत नाही. एकमेकांबद्दल आपुलकी, जिव्हाळाही कमी झाला आहे. परंतु ग्रामीण भागात माणसासोबतच प्राण्यांनाही जीवापाड जपले जाते याचा प्रत्यय नेहमी येतो. मुखेड तालुक्यातील सावरगाव माळ हे हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावातील शेतकरी शंकर कोकले यांच्याकडे राजा नावाचा कोंबडा होता. गावात स्वच्छंदपणे हुंदडणारा हा कोंबडा सर्वांचा लाडका झाला होता.
गावातील नागरीकही तो जवळ आल्यानंतर प्रेमाने त्याला खायला देत होते. परंतु चार दिवसापूर्वी मांजरीने राजावर हल्ला केला. त्यानंतर कोकले यांनी चार दिवस त्याच्यावर उपचार केले. परंतु अखेर रविवारी सायंकाळी राजाने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे शंकर कोकले यांच्यासह ग्रामस्थही शोकाकूल झाले होते. आपल्या लाडक्या राजाला वाजत-गाजत निरोप देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यानुसार बँडबाजा वाजवत घरापासून कोकले यांच्या शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या ठिकाणी खड्डा करुन राजावर अंत्यसंस्कार केले. दहा वर्षात ग्रामस्थांनी मने जिंकणार्या लाडक्या राजाला निरोप देताना अनेकांना हूरहूर वाटली.