‘किसान ॲप’बाबत शेतकरी अनभिज्ञ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतरच अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:59+5:302021-05-27T04:19:59+5:30

नांदेड : शासनाच्या विविध योजना तसेच हवामानाविषयी शेतकऱ्यांना वेळीच माहिती उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करून ...

Farmers ignorant about 'Kisan App'; Alert only after storms come and go! | ‘किसान ॲप’बाबत शेतकरी अनभिज्ञ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतरच अलर्ट!

‘किसान ॲप’बाबत शेतकरी अनभिज्ञ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतरच अलर्ट!

नांदेड : शासनाच्या विविध योजना तसेच हवामानाविषयी शेतकऱ्यांना वेळीच माहिती उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने किसान ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु बहुतांश शेतकरी या किसान ॲपबाबत अनभिज्ञ असून ज्यांच्याकडे ॲप आहे त्यांना ही हवामानाविषयीची माहिती, वादळ-वारे येऊन गेल्यानंतर मिळत आहे. त्यामुळे हे ॲप फारसे उपयोगी पडत नसल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांना हवामान बदलाची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने किसान (शेतकरी) ॲप नावाचे ॲप्लिकेशन मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप शेतकऱ्यांच्या उपयोगी नसल्याने तसेच त्यातील अंदाज उशिरा मिळत असल्याने शेतकरी या ॲपचा वापर करीत नाहीत.

किसान ॲपवरून मिळतेय ही माहिती

किसान ॲपवरून शेतकऱ्यांना हवामान व शासन योजनांची सविस्तर माहिती पोहोचविली जाते.

केंद्र व राज्य शासनाशी संलग्नित असल्याने दोन्ही सरकारच्या योजनांची माहिती उपलब्ध होते.

अवकाळी पाऊस, वादळीवारा, चक्रीवादळ आदी विषयींचे संकेत या ॲपच्या माध्यमातून मिळतात.

परिसरातील हवामान व पेरणीच्या अनुषंगाने मार्गदर्शन तसेच माहिती उपलब्ध करून देण्यात येते.

अपडेट वेळेत मिळावेत...

शासनाचे ॲप कोणते आहे यासंदर्भात जनजागृती व वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक आहे.

हवामान, पेरणी तसेच वादळ याविषयीची अचूक माहिती, अलर्ट मिळणे आवश्यक आहे.

एकाच ॲपच्या माध्यमातून हवामान, पीक, पेरणी, लागवड मार्गदर्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे.

शेतकरी ॲप व इतर कृषीविषयी माहिती देणारी अनेक ॲप्लिकेशन मोबाइलमध्ये घेतली आहेत. शासनाच्या विविध खरेदी केंद्रांवर शेतमालाला मिळणारे भाव पाहता येतात. परंतु प्रत्यक्षात चौकशी केल्यानंतर तिथे वेगळ्याच दराने खरेदी केली जाते. नांदेड परिसरात अवकाळी पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा अंदाज ॲपवर दाखविण्यात आला.

- नारायणराव खानसोळे, शेतकरी

सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे आजपर्यंत दीड हजारापेक्षा अधिकचे पैसे देऊन मोबाइल खरेदी करता आला नाही. त्यामुळे कोणते ॲप असते तेच माहिती नाही. शासनाने ग्रामपंचायतीमार्फत चावडीवर सूचना देणे गरजेचे आहे.

- नवनाथ वाडकर, शेतकरी

शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे ॲप मोबाइलवर उपलब्ध आहे. परंतु शासनमान्य ॲप कोणते आहे याविषयीची माहिती बहुतांश शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अनेक ॲप डाऊनलोड केल्यानंतर फसवणूकदेखील होते. त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या ॲपविषयी जनजागृतीबरोबरच मार्गदर्शन आवश्यक आहे.

- बालाजी नादरे, शेतकरी

शासनाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या शेतकरी ॲप तसेच इतर कृषी ॲपबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. परंतु आजही लाखो शेतकरी यापासून दूर आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून वापर वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- आर.बी. चलवदे,

जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

Web Title: Farmers ignorant about 'Kisan App'; Alert only after storms come and go!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.