रुमालाने गळा आवळून शेतमजुराची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:06 IST2020-07-07T13:04:54+5:302020-07-07T13:06:40+5:30
पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत बाजूच्या झुडपात लपवून ठेवले.

रुमालाने गळा आवळून शेतमजुराची हत्या
उमरी (जि. नांदेड ) : उमरी पोलीस स्टेशन हद्दीतील बल्लाळ ता. भोकर येथे एका मजुराचा शेतामध्येच गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारुती गंगाधर गाडेकर ( ३४ ) असे मृताचे नाव आहे. ते सोमवारी ( दि. ६ ) रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शेतात जाऊन शोध घेतला. यावेळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती गाडेकर हे गावातीलच मोहन रामराव श्रीखंडे यांच्या शेतामध्ये मजुरीने काम करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी मारुती यांच्या अंगावरील रुमालाने त्यांचा गळा आवळून त्यास ठार केले. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत बाजूच्या झुडपात लपवून ठेवले. याप्रकरणी शेतमालक मोहन श्रिखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी एका महिलेसह दोघांना संशयावरून उमरी पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे हे पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी ७ जुलै रोजी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.