नांदेड: जवळपास १२ महिला आणि पुरुष मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. ही घटना शुक्रवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास घडली. विहिरीत पडलेल्या पैकी दोन महिला आणि एका पुरुषाला वर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतु मागील तीन तासापासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याने विहिरीत पडलेल्यांपैकी ९ जण मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नांदेड तालुक्यातील आलेगाव आणि रुंज येथील महिला, पुरुष मजुरांना घेऊन भुईमूग काढण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहेत. सदर ट्रॅक्टर हा एक १५ वर्षाचा मुलगा चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.