हिमायतनगर : तेलंगणा राज्यातून विविध कंपनीचे बोगस खते आणून ते विनापरवाना विक्री करणाऱ्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकून २२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तेलंगणातील तीन व हिमायतनगर येथील एकावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एका गोदामात बोगस खतांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी गंगाधर भदेवाड यांना मिळाली. त्यानंतर २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस असलेल्या सरदार सॉ-मिलजवळ पत्र्याच्या टिनशेडमध्ये छापा टाकला. यावेळी खुशी क्रॉप केयर कंपनीचे खते बोलेरो पिकअप (एमएच २६ बीई ३२९५) या वाहनातून विक्री करताना आढळून आले. संबंधितांकडे खत विक्री परवाना, उगम प्रमाणपत्र तसेच कंपनी अधिकाऱ्याचे नाव व इतर कागदपत्रे आढळून आली नाहीत. तेलंगणा राज्यात निर्मित केलेले ७ लाख ५९ हजार ४७२ रुपये किमतीचे खत गोडावूनमधून अनधिकृतपणे, विनापरवाना बोलेरो गाडीतून नेले जात होते.
कृषी अधिकारी भदेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी करूपल्ली व्यंकण्णा (वय ४२, रा. मरली चमकोणिबावी), गुराम पोडे मंडल (रा. वटीकोडे, नालागोंडा), प्रवीण व्यंकय्या आडेप्पू (२२, रा. नालागोंडा), मलेश सत्यनारायण बोडला (३५, रा. हैदराबाद), ख्वाजा नसीर ख्वाजा वजीर (४२, रा. भोकर, हल्ली मुक्काम हिमायतनगर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमोल भगत करीत आहेत.
राजकीय नेत्याचा वरदहस्तशहर व तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना अनधिकृतरीत्या खताची विक्री करण्याचे धाडस कोणाच्या मदतीशिवाय करणे शक्य नाही. त्यामुळे यामागे मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत येथील कृषी व्यापारी संघटनेने व्यक्त केले आहे. हा गोरखधंदा चालवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला, तरी या धंद्याला अभय देणाऱ्या ‘आका’चा शोध घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्गातून केली जात आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कृषी व्यापारी तळ ठोकून होते. दरम्यान, जप्त केलेला बोगस साठा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या गोदामात होता.