ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी अपयश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:18+5:302021-02-06T04:31:18+5:30

किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी व मका या भरड धान्यांची आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक ...

Failure to buy sorghum, maize! | ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी अपयश!

ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी अपयश!

किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी व मका या भरड धान्यांची आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय कार्यान्वित असून, यावर्षी प्रथमच धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७०० रुपयांचा बोनस जाहीर केल्याने १ हजार ८३४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. मात्र, ज्वारी व मक्याचा एक किलोही खरेदी करण्यास महामंडळाला अपयश आले. ज्वारी व मका खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नोंदणी केली आणि शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केंद्रांवर आली. मात्र, जो माल आला जुना असल्याने रिजेक्ट केल्याचे आदिवासी विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०२० ही ज्वारी व मका खरेदीची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत एक किलोही ज्वारी, मका खरेदी करण्यात आली नाही. खरेतर खरीप हंगामात ज्वारी पिकाचे क्षेत्र १ हजार २२१ हेक्टर होते. कृषी विभागानुसार ज्वारीचे हेक्टरी २ क्विंटल ६९ किलो उत्पन्न मिळाले. याप्रमाणे ३ हजार २८४ क्विंटल ४९ किलो ज्वारीचे उत्पन्न मिळाले असलेतरी एक किलोही ज्वारी आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर आली नाही.

किनवटच्या उपप्रादेशिक कार्यालयात महिनाभरापासून प्रभारीराज!

किनवटच्या आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. बरकमकर यांची बदली २ जानेवारी रोजी झाल्यानंतर इथे सुरेश अंबाडकर हे घोट येथून आले; परंतु त्यांना यवतमाळ येथील प्रादेशिक व्यावस्थापक कार्यालयाचा अतिरिक्त भार सोपवल्याने ते किनवटला रुजूच झाले नाहीत. परिणामी, आदिवासी विकास महामंडळाच्या एका लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे उपप्रादेशिक व्यवस्थापकाचा पदभार सोपवण्यात आल्याने जेव्हा जेव्हा कार्यालयास भेट दिली, तेव्हा तेव्हा प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयात मिळून आले नाहीत. सध्या तरी हे कायार्लय रामभरोसे सुरू आहे.

Web Title: Failure to buy sorghum, maize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.