गोदावरी जलशुद्धीकरणासाठी बायो एंजाइमचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:49+5:302021-02-06T04:30:49+5:30

नांदेड : गोदावरी नदी संसद लोकचळवळमार्फत जल शुद्धीकरण कारसेवा राबविण्यात येत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी गोदावरी नदी संसदने ...

Experiment of Bio Enzyme for Godavari Water Purification | गोदावरी जलशुद्धीकरणासाठी बायो एंजाइमचा प्रयोग

गोदावरी जलशुद्धीकरणासाठी बायो एंजाइमचा प्रयोग

नांदेड : गोदावरी नदी संसद लोकचळवळमार्फत जल शुद्धीकरण कारसेवा राबविण्यात येत आहे. नदीतील पाणी स्वच्छ होण्यासाठी गोदावरी नदी संसदने पुढाकार घेत बायो एंजाइमचा प्रयोग राबविण्यास प्रारंभ केला आहे. या उपक्रमात नागरिकांनी दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शहराच्या वैभवात भर घालणारी गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, तिचे शुद्धीकरण करण्याची जबाबदारी प्रत्येक नांदेडकराची असून, त्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण समाज संघटित होऊनच रोखू शकतो. सध्या जगात जैविक जलशुद्धीकरण प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. त्याचा परिणाम अत्यंत ठळक दिसून येत आहे. या सिद्ध प्रयोगाच्या आधारे गोदावरी नदी संसद "जैविक जलशुद्धीकरण कारसेवा" सुरू करत आहे. केवळ आपली १० ते १५ मिनिटे या उपक्रमासाठी द्यावी लागणार आहेत. त्यासाठी बाहेर जाण्याचीही गरज नसल्याचे आयोजकांनी सांगितले. संपूर्ण अभ्यासाअंती गोदावरी नदी संसद टीमने हे आवाहन केले आहे. त्यासाठी स्वतःच्या घरीच राहून, घरातीलच वस्तू वापरून करता येणारे जैविक जलशुद्धीकरण तंत्र म्हणजे "बायो एंजाइम". त्यासाठी गुळ, संत्रे / मोसंबीची साल किंवा वाहिलेली फुले, ताक किंवा इस्ट, पाणी, प्लास्टिकची बॉटल, असे साहित्य आवश्यक आहे. त्याचे प्रमाण १:३:१०, उदा. १०० ग्रॅम, गूळ : ३०० ग्रॅम संत्रे / मोसंबी साल, वाहिलेली फुले : १ लीटर पाणी, एका प्लास्टिक बॉटलमध्ये झाकण बंद करून ३० ते ४५ दिवस सावलीत ठेवावे लागेल. पाहिले १० दिवस रोज दिवसातून १ वेळेस झाकण उघडणे (गॅस निघून जाण्यासाठी). पुढील २० दिवस २ दिवसाकाठी एक वेळेस झाकण उघडणे आवश्यक आहे. ३० दिवसात "बायो एंजाइम" तयार होईल. सदर तयार मिश्रण कपड्याने गाळून घेणे.

एक लीटर बायो एंजाइम १० हजार लीटर पाण्याला स्वछ करते.

सहभागींना मिळणार प्रमाणपत्र

तयार करण्यात आलेले "बायो एंजाइम" आपण नदी पात्रात, प्रदूषित जलसाठ्यात सोडू शकतो. "बायो एंजाइम" जलचर, वनस्पती, पशु पक्ष्यांना बिलकुल हानिकारक नाही. प्रत्येकजण गोदावरी नदी जैविक जलशुद्धीकरण कारसेवा करू शकताे. कारसेवा पूर्ण करणाऱ्यांसाठी गोदावरी नदी संसदतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून दीपक मोरताळे यांनी कळविले आहे.

Web Title: Experiment of Bio Enzyme for Godavari Water Purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.