मुलांच्या हट्टापायी क्रिकेट खेळणे माजी मंत्र्याच्या अंगलट; कॅच पकडताना पडून झाले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:34 IST2023-10-21T13:34:16+5:302023-10-21T13:34:35+5:30
देवीच्या समोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सावंत यांना क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळावा असा आग्रह केला.

मुलांच्या हट्टापायी क्रिकेट खेळणे माजी मंत्र्याच्या अंगलट; कॅच पकडताना पडून झाले जखमी
नांदेड : काका तुम्ही आमच्या सोबत क्रिकेट खेळा, असा आग्रह करणाऱ्या मुलांचा हट्ट पूर्ण करायला गेलेल्या माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा कॅच पकडताना तोल गेला. ते जमिनीवर पडले असता त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
नांदेड येथील शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर देवी बसविली जाते. याच ठिकाणी माजी मंत्री सावंत याचेही घर आहे. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या समोर अनेक जण जागरण करत असतात. माजी मंत्री सावंत, काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि मित्र मंडळी या ठिकाणी गप्पा मारत बसले होते.
दरम्यान, देवीच्या समोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सावंत यांना क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळावा असा आग्रह केला. त्यानंतर क्रिकेट खेळत असताना बॉल पकडताना ते जमिनीवर पडले. खाली सिमेंट काँक्रिट असल्याने त्यांच्या डोक्याला आणि उजव्या खांद्याला जबर दुखापत झाली. तद्नंतर लगेचच त्यांना नजीकच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.