अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ४२ चौक्यांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 07:49 PM2020-03-19T19:49:07+5:302020-03-19T19:51:31+5:30

जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे.

Establishment of 42 checkposts in Nanded district to prevent illegal sand theft | अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ४२ चौक्यांची स्थापना

अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ४२ चौक्यांची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक वाळू वाहनांची होणार तपासणी

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळू चोरी आणि अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने जिल्ह्यात ४२ ठिकाणी संयुक्त चौक्या उभारल्या आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक वाळू वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत राजकीय कलगीतुराही अनेकदा रंगला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीचा विषय गांभीर्याने घेताना जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची बैठक घेवून वाळू चोरीवर आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ चौक्या उभारण्यात येणार आहेत. या चौक्यांमध्ये नांदेड तालुक्यात ८ चौक्या राहणार आहेत. त्यात असर्जन येथील जुना जकात नाका, निळा रोड येथील जयभवानी चौक, वाय पॉर्इंट, पासदगाव येथील जाधव पेट्रोलपंप, कामठा येथील शंकरराव चव्हाण चौक, ब्रह्मपुरी येथील बोंढार ब्रीजजवळ, धनेगाव चौरस्ता येथील वाघाळेकर पेट्रोलपंप, हस्सापूर टी पॉइंट आणि वाजेगाव चौरस्ता येथे चौक्या राहणार आहेत.

भोकर तालुक्यात उमरी टी पॉइंट, उमरी रोड, मुदखेड तालुक्यात आमदुरा, हदगाव तालुक्यात उमरखेड पॉइंट, बामणी फाटा आणि तामसा येथे तामसा चौक, हिमायतनगर तालुक्यात पळसपूर चौक, कामारी चौक, किनवट तालुक्यात कोठारी चि., घोटी, माहूर तालुक्यात केरोळी फाटा, लांजी पॉइंट, कंधार तालुक्यात गोळेगाव पाटी, तेलूर फाटा, लोहा तालुक्यात शिवाजी चौक लोहा, माळेगाव, सोनखेड आणि मारतळा (हातणी पाटी), देगलूर तालुक्यात सांगवी उमरी गावात शेवाळा नंदूर रस्त्यावर, धर्माबाद तालुक्यात बाभळी चौक, राजापूर, सिरजखोड फाटा, उमरी तालुक्यातील कारेगाव फाटा, बळेगाव चौक, हातणी चौक, बिलोली तालुकतील हुनगुंदा, जुने गावठाणजवळ, येसगी मांजरा नदीजवळील पुलाजवळ, आदमपूर, नरसी ते देगलूर रोडवर, आदमपूर कमान, लोहगाव फाटा आणि  नायगाव तालुक्यातील वजिरगाव फाटा, बळेगाव व गडगा येथे या चौक्या राहणार आहेत. 

वाळू वाहतूक होणाऱ्या भागांचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. ईटणकर यांनी ज्या भागातून वाळू वाहतूक होते त्या भागातील चौक्यांची माहिती मागवली होती. या चौक्यावर पोलीस, महसूल  आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पोलीस व महसूल विभागाने संयुक्त पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४२ चौक्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. या चौक्यांमध्ये आणखी वाढ केली जाईल, असेही मगर यांनी सांगितले. 

Web Title: Establishment of 42 checkposts in Nanded district to prevent illegal sand theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.