बदलते राजकारण! तेलंगणाची BRS महाराष्ट्रात, राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:25 IST2022-12-22T17:24:02+5:302022-12-22T17:25:17+5:30
सिमावर्ती भाग तेलगु भाषिक असल्याने तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्षाने या भागातून पक्षाचा विस्तार करण्यास एकवटला आहे.

बदलते राजकारण! तेलंगणाची BRS महाराष्ट्रात, राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश
भोकर (नांदेड) : तालुक्यातील किनी येथे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने वन व पर्यावरण राज्यमंत्री अमोल इंद्रकरण रेडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाचा विस्तारीकरण सोहळा सुरु झाला आहे. भोकर विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केल्याने विविध राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तालुक्यांतील अधिकांश सिमावर्ती भाग तेलगु भाषिक असल्याने तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्षाने या भागातून पक्षाचा विस्तार करण्यास एकवटला आहे. सिमावर्ती तेलंगणातील मुधोळ येथील आमदार जी. विठ्ठल रेड्डी, किनीचे माजी सरपंच नरसारेड्डी गोपीलवाड, तिरपत रेड्डी, नरसा रेड्डी, रामकृष्ण रेड्डी, महिपाल रेड्डी, बाशेट्टी राजेन्ना, बी. शामसुंदर, व्यंकटराम रेड्डी, गंगाचरण, गणेश जाधव, शंकर चव्हाण यांच्यासह निर्मल, म्हैसा, कुबेर येथील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री ए. इंद्रकरण रड्डी म्हणाले की, भाजप सरकारने भारतियांची घोर निराशा केली आहे. अदानी - अंबानी यांच्या हाती उद्योग देण्याचा सपाटा लावला जात आहे. तेलंगणा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्यात येते, तसेच दोन हप्त्यांत १० हजार रुपये देणारे पहिले राज्य आहे. पेन्शन योजना राबवून गोरगरीबांना दिलासा देण्यात येतो. अशा स्वरुपाच्या योजना देशात राबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी बीआरएस पक्ष देशातील विविध राज्यात आपला विस्तार करीत आहे. दरम्यान, किनी येथे मंत्री इंद्रकरण रड्डी यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. परिसरातील अनेक गावांचे नागरिक कार्यक्रमाला हजर होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेडला येणार
पुढील महिन्यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे नांदेड येथील पवित्र गुरुद्वाराचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सदरील कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन यावेळी मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी यांनी केले आहे.