भोकर शहराला भूकंपाचा हादरा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:26 IST2025-09-20T17:25:36+5:302025-09-20T17:26:16+5:30

या हादऱ्यांमुळे नागरिक प्रचंड घाबरले आहेत.

Earthquake tremors felt in Bhokar city; District administration urges citizens to remain alert | भोकर शहराला भूकंपाचा हादरा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भोकर शहराला भूकंपाचा हादरा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भोकर : तालुक्यातील पांडुरणा येथे काल(दि.१९) सायंकाळी भूगर्भातून आवाज आल्यानंतर, आज(दि.२०) सकाळी १० व १०.१५ वाजता भोकर शहरातील काही भागात भूकंपाचे हादरे बसले होते. या हादऱ्यांमुळे नागरिक प्रचंड घाबरले आहेत. मात्र, नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पूर्वेला व पश्चिमेला भूगर्भातून आवाज आले होते. याबाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता, या आवाजाची किंवा धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, दुसऱ्याच दिवसी सकाळी १० व १०.१५ वाजता भोकर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या पाठीमागील वस्तींमध्ये जमिनीतून आवाज येऊन दोन वेळा जमीन हादरल्याची घटना घडली. 

यामुळे स्थानिक रहिवाशी घाबरुन तात्काळ घराबाहेर पडले.  प्रशासनाने पुन्हा एकदा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता, या धक्क्याची कुठलीही नोंद संकेतस्थळावर झाली नसल्याचे दिसून आले. पण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर दोन धक्क्यांपैकी १० वाजता बसलेल्या धक्क्याची नोंद झाली असून, या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर १.१ एवढी नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू तालुक्यातीलच  बोरवाडी गावाच्या आसपास असल्याचे विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे व अशा पद्धतीचे कंपन अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण, अथवा उपसामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वीदेखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले.  

तसेच, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

Web Title: Earthquake tremors felt in Bhokar city; District administration urges citizens to remain alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.