खाजगी सावकारीच्या त्रासाने युवकाचा ह्दयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:55 IST2018-11-17T00:53:22+5:302018-11-17T00:55:09+5:30
घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़

खाजगी सावकारीच्या त्रासाने युवकाचा ह्दयविकाराने मृत्यू
नांदेड : सिडको भागातील एका वडा पाव विक्रेत्याचा आर्थिक अडचणीमुळे दोघांच्या नावे शेतीची रजिस्ट्री करुन दिली होती़ घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही जमिन परत न देता खाजगी सावकारांकडून वारंवार धमकी देण्यात येत असल्याच्या तणावात ह्दयविकाराचा झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना गुरुवारी रात्री घडली़ या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सुरेश शंकरराव गिरडे (४५) असे मयताचे नाव आहे़ पूर्वी ते आॅटो चालवित होते़ लोहा तालुक्यातील कारेगांव येथे गट क्रमांक ११२ मध्ये त्यांची पाच एकर जमीन आहे़ २००४ पासून सुरेश गिरडे यांनी बीक़े़हॉलसमोर वडापावचा गाडा सुरु केला होता़ याच ठिकाणी त्यांची संजय नागरगोजे आणि माधवराव कागणे यांच्यासोबत ओळख झाली़ आर्थिक अडचणीमुळे सुरेश गिरडे यांनी या दोघांकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते़
त्या बदल्यात पाच एकर जमिनीपैकी एक एकर जमिनीची रजिस्ट्री त्यांच्या नावे करुन दिली होती़ जमिन नावे करुन देताना व्याजाचे पैसे दिल्यानंतर ती जमीन परत गिरडे यांना देण्याचे ठरले होते़ त्यानंतर गिरडे यांनी व्याजाने घेतलेली सर्व रक्कम तीन पंचासमोर परत केली़ परंतु कागणे आणि नागरगोजे यांनी त्यांची एक एकर जमीन परत करण्यास टाळाटाळ सुरु केली़ याबाबत सुरेश गिरडे आणि त्यांच्या पत्नीने सावकारांकडे अनेकवेळा घेतलेली जमीन परत करण्यासाठी विनंती केली़ परंतु दरवेळी त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती़
कागणे आणि नागरगोजे यांनी गिरडे यांच्या घरी जावून त्यांना धमकाविणे सुरु केले़ त्यात गिरडे यांचे काही दिवसापूर्वीच बायपास झाले होते़ त्यामुळे त्यांची प्रकृती ठिक राहत नव्हती़ त्यात सावकारांच्या त्रासामुळे ते कायम तणावात होते़ त्याच तणावात सुरेश गिरडे यांनी गुरुवारी ह्दयविकाचा धक्का बसला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी सुमित्रा गिरडे यांच्या तक्रारीवरुन संजय नागरगोजे आणि माधव कागणे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
दरम्यान, शुक्रवारी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता़ विशेष म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी महिलेने या संदर्भात पोलिसात तक्रारही दिली असल्याची माहिती आली आहे़