दिव्यांग पती ठरू लागला अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवले त्याचे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:40 IST2021-02-22T19:34:33+5:302021-02-22T19:40:53+5:30
दिव्यांगाच्या खुनाचा झाला उलगडा; पत्नीने प्रियकरासोबत कट रचून खून केल्याचे स्पष्ट

दिव्यांग पती ठरू लागला अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवले त्याचे जीवन
नांदेड : शहरातील बोंढार परिसरात पुलाखाली १४ फेब्रुवारीला सय्यद मनसब अली सय्यद मुमताज अली या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. चाकूने वार करून या अपंगाचा खून केला होता. पत्नीच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच, प्रियकराने इतर दोघांच्या मदतीने मनसबचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणात सय्यद अकबर अली यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर, उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी मनसबच्या घरी जाऊन चौकशी केली होती. या प्रकरणाचा तपास सपोनि असद शेख यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाचे पोउपनि. दत्तात्रय काळे यांनी सायबर सेलच्या माध्यमातून तपासाला गती दिली. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. मनसबला अपंगत्वाचा झटका आला होता. त्यानंतर, त्याची पत्नी हैदराबाद येथे राहत होती.
हैदराबाद येथे तिचे महंमद जफर याच्याशी सूत जुळले. या दोघांनी लग्न करावयाचे ठरविले, परंतु त्याला मनसबने विरोध केला. त्यामुळे जफरने मनसबचा काटा काढण्याचे ठरविले. १४ फेब्रुवारी राेजी मनसबला दारू पाजून ऑटोतून शहरातील वेगवेगळ्या भागात फिरविले. त्यानंतर, बोंढार शिवारात नेऊन गळा आवळल्यानंतर चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. मनसबच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी पथक हैदराबादला रवाना झाले आहे.