लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीतील वाद विकोपाला; निर्बंध हटताच पीडित महिलांनी गाठले पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:22 IST2020-07-15T20:20:03+5:302020-07-15T20:22:38+5:30
लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नीतील वाद विकोपाला; निर्बंध हटताच पीडित महिलांनी गाठले पोलीस ठाणे
- शिवराज बिचेवार
नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे अडीच महिन्यांहून अधिक काळ अनेकजण घरातच अडकून पडले होते़ व्यवसाय, नोकरीचा ताण अन् हाताला काम नसल्याच्या मनस्थितीत क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीत गृहकलह वाढला़ त्याचा परिणाम म्हणून अनलॉक होताच पोलीस ठाण्यांमध्ये छळाच्या तक्रारी सुरु झाल्या़ जून महिन्यात अशा १६ विवाहितांनी ठाण्याची पायरी चढली़ तर बलात्काराचेही सात गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़
अचानक घोषित झालेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरातच बंदिस्त झाले़ सामाजिक संपर्क तुटला, व्यवहार ठप्प झाले़ बहुसंख्य लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सर्व बाबींमुळे लोकांच्या मानसिक, भावनिक आणि वर्तणुकीवर वाईट परिणाम होत आहे़ चिंता, निद्रानाश, चिडचिड, नैराश्य आणि भविष्याबद्दल अनिश्चतता लोकांच्या मनात घर करु पाहत आहे़ त्यामुळे आक्रमक होवून हिंसक प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. त्याचा परिणाम कुटुंबातील वातावरणावर होत आहे़ विशेष करुन पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरुन झालेले वादही त्यामुळे ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत़ २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला़ त्यात एप्रिल आणि मे महिन्यात त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली़ परंतु, जून महिन्यात त्यामध्ये सूट दिली़ लॉकडाऊनमध्ये सूट देताच पोलीस ठाण्यातील गृहकलहाच्या तक्रारींचा ओघही वाढला़ मे महिन्यात बलात्काराचे ४, विनयभंगाचे २४ आणि छळाचे फक्त ३ गुन्हे दाखल होते़
जूनमध्ये बलात्काराचे ७, विनयभंगाचे २४ आणि छळाच्या गुन्ह्यात वाढ होवून ते १६ झाले होते़ तर जुलैमध्ये आतापर्यंत ३ छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत़ आता पुन्हा एकदा आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे़ त्यामुळे गृहिणींच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे़ किरकोळ कारणावरुन झालेले भांडणही घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे़ पोलिसांकडून अशा जोडप्यांसाठी ‘भरोसा सेल’ सुरु करण्यात आला आहे़ या ठिकाणी पती-पत्नी अन् त्यांच्या कुटुंबीयांचे योग्य समुपदेशन करुन त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो़
एकमेकांना समजून घ्या, मार्ग निघेल
येणारा काळ जरी अनिश्चिततेने ग्रासलेला असला तरी, लोकांनी सकारात्मक मानसिकता बाळगलीच पाहिजे़ मानसिक ताण जाणवला तर आपले आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्र यांच्याशी संवाद साधला पाहिजे़ पती अन् पत्नी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे़ रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी संगीत, कला यासह इतर छंद जोपासा़ ज्या कारणामुळे घरात वाद होतात़ अशा कारणांचा शोध घेवून पती-पत्नीने एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा़ संतुलित आहार, शारीरिक श्रम आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे़ कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये़ एकमेकांना समजून घ्यावे़ - डॉ़रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ