नांदेडमध्ये शिंदेसेनेच्या आमदारांत असमन्वय, युतीसाठी बालाजींना हवी भाजप तर पाटलांना राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:18 IST2025-12-19T18:17:20+5:302025-12-19T18:18:24+5:30
राज्य पातळीवरील नेत्यांच्या आदेशाने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्राथमिक चर्चा केली.

नांदेडमध्ये शिंदेसेनेच्या आमदारांत असमन्वय, युतीसाठी बालाजींना हवी भाजप तर पाटलांना राष्ट्रवादी
नांदेड : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात पहिल्या टप्प्यातील बैठक सकारात्मक झाली असली तरी शिंदे गटातील आमदारांमध्येच एकवाक्यता नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर म्हणतात दादांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव नाही, अन् त्यांचेच नेते नामदार हेमंत पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेतात. यातून शिंदे सेना नेमकी कुणासोबत जाणार? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.
राज्य पातळीवरील नेत्यांच्या आदेशाने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्राथमिक चर्चा केली. यावेळी ५०-५० जागांचा फाॅर्म्युला आणि प्रभागातील संभाव्य जागा आदींवर सकारात्मक चर्चा झाल्याचे दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. परंतु, आमदार तसेच बडे नेते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने भाजपसमोर ६०-४० जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवला असून, चर्चेतून मार्ग निघेल, आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत, अशी भूमिका आमदार बालाजी कल्याणकर यांनी मांडली. मात्र, शिंदे गटाचे नेते नामदार हेमंत पाटील यांनी दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. कल्याणकर यांची भूमिका अणि हेमंत पाटील यांची कृती पाहता शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नामदार पाटील यांच्या मते मागील ४० वर्षांचा अनुभव पाहता भाजप नेते खासदार अशोकराव चव्हाण हे युती करणारच नाहीत. त्यामुळेच त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
शिंदे सेनेचा मुस्लीम अन् दलित मतदारांवर डोळा
भाजपसोबत गेल्यास मुस्लीम आणि दलित समाजातील मतदार स्वीकारणार नाहीत, अशी भीती शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत योग्य ती वाटाघाटी करून भाजपशी थेट लढत द्यावी, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिंदे सेनेचे नेते नामदार हेमंत पाटील आणि प्रतापराव चिखलीकर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आणि चिखलीकरांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारापासून हेमंत पाटील आणि अशोकराव यांच्यातही बिनसल्याने पाटीलदेखील त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असा सूर आहे.