दिव्यांगांना मिळणार हक्काचे घरकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:12+5:302021-02-05T06:10:12+5:30
नांदेड : बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक दिवंसापासून आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू ...

दिव्यांगांना मिळणार हक्काचे घरकूल
नांदेड : बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक दिवंसापासून आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची मनपा प्रशासनाने दखल घेतली असून, दिव्यांगाना घरकूल देण्यासाठी जाहीर प्रगटन दिले आहे. त्यानुसार, दिव्यांगाना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना आता हक्काचे घरकूल मिळणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून दिव्यांगांना हक्काचे घरकूल मिळावे, यासाठी कमल फाउंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती आंदोलन, उपोषण करीत आहे. या आंदोलनाची लोकप्रतिनधींनीही दखल घेतली होती, परंतु त्यानंतरही दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. दिव्यांगांनी आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले होते. यावेळी मात्र प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली. दिव्यांगाकडून घरकुलासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाची प्रत्यक्ष तपासणी करून इतरही एखादा गरजू दिव्यांग घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दिव्यांग अधिनियम २०१६ अन्वये पाच टक्के घरकूल देण्याची तरतूद असल्याने, तसेच संघटनेच्या मागणीनुसार बीएसयूपी योजनेतील शिल्लक घरकुलाचाही लाभ मिळण्याच्या मागणीसाठी मनपाने १० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच यापूर्वी ज्या दिव्यांगांनी घरकुलासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांनी परत प्रस्ताव दाखल करू नयेत, तसेच नव्याने प्रस्ताव दाखल करणारे जे दिव्यांग आहेत, त्यांनी दिलेल्या तारखेतच प्रस्ताव दाखल करावेत.