शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:47+5:302021-02-05T06:09:47+5:30
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हाधिकारी नांदेड डॉ. ...

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियान
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन ईटनकर यांच्या संकल्पनेतून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे आयोजन करण्यात आले. परिसरात जवळपास ६० स्टॉल्सची उभारणी केली असून, लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात २६ जानेवारी रोजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सदर अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ. अमरभाऊ राजूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह अधिकारी कर्मचारी, शेतकरी, ग्राहक उपस्थित होते.
उद्घाटनानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील यशस्वी शेतकऱ्यांची तसेच रयत बाजारात सहभागी शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात एकूण ११ शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या यशोगाथेची पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री केल्यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन मालाची योग्य रक्कम मिळण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.
या उपक्रमाला आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. राजेश पवार, पवार आदींनी भेट दिली.
शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्य व्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादित उत्पादने मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आली आहेत. फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा अशी अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मुसळी, ड्रॅगन फ्रूट, स्ट्रॉबेरी, अशी नावीन्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती.
ग्राहकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
या उपक्रमात ग्राहकांना ताजा माल मिळत आहे आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा होत आहे. २९ जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू होणार आहे. यानंतरच्या काळातही अशा प्रकारच्या विक्रीचे काही स्टॉल्स जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्राहकांना उपलब्ध राहतील व शेतकऱ्यांचा थेट शेतीमाल विक्री करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांनी विविध माल खरेदी करून शेतकरी हित जोपासावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले आहे.