धर्माबादेतील पंप हाऊस दुरुस्तीचे काम वेगाने सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:10 IST2019-04-26T01:08:57+5:302019-04-26T01:10:40+5:30
येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले.

धर्माबादेतील पंप हाऊस दुरुस्तीचे काम वेगाने सुरु
धर्माबाद : येथील नगरपालिका अंतर्गत असलेल्या धर्माबाद शहराला एक नव्हे दोन दिवस नव्हे, तब्बल सात दिवसापासून ऐन उन्हाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पंप दुरूस्ती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून नांदेड येथील मेकॅनिकला बोलावण्यात आले. नगरपालिका वेगाने कामाला लागली. पंप दुरुस्तीमुळे २५ एप्रिल रोजी म्हणजेच आठव्या दिवशी शहराचा अख्खा पाणीपुरवठाच बंद करून टाकला.
इळेगाव गोदावरी पात्रातून व बाभळी बंधारातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होतो. इळेगाव गोदावरी पाञात दोन पंप असून त्यातील एक पंप मोटर आत खोलवर पाणी खेचतो़ तर एक पंप मोटर आत खोलवरच पाणी खेचत नाही. त्यातील एक पंप मोटर सात दिवसापूर्वीच खराब झाला तरी धर्माबाद नगरपालिकेने पंप दुरुस्तीसाठी काहीही हालचाली केल्या नाहीत. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. यंत्रणा ककामाला लागली. पंप दुरुस्तीसाठी नांदेडहून संबंधित कुशल कामगारांना बोलाविण्यात आले असून, संबंधित कामगारांनी पंप दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताअगोदर पालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना शहरात दूषित पाणी पुरवठा होत नसल्याचे माहिती नव्हते काय? नगरसेवकही यासंदर्भात काहीही बोलले नाहीत. हा एकूणच प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर आरोप नागरिकांंनी केला असून, दूषित पाण्यामुळे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पालिकेचे संबंधित जबाबदार राहतील, असेही नागरिकांंनी सांगितले.
दुसरीकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात आनंदी आनंद आहे. विभागात अनुभवी आॅपरेटरची कमतरता आहे.
पंप खराब झालाच तर काय करावे? काय करु नये? याचे ज्ञान सध्या असलेल्यांना नाही. एकूणच विभागात समन्वयाचा अभाव जाणवतो. दुसरीकडे पाणी पुरवठ्यावर मात्र लाखो रुपये खर्च दाखविला जातो, हा खर्च जातो कुठे? हा संशोधनाचा विषय आहे. नगरसेवकही याकडे लक्ष देण्यास तयार होत नसल्याने नागरिक नाराज झाले असून दाद मागावी कोणाकडे ? असा सवाल करीत आहेत.
पंप दुरूस्ती चालू असून बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी झाली आहे. दुरूस्ती झाल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे बळेगावचे पाणी सोडण्याची मागणी करणार आहोत
-मंगेश देवरे, मुख्याधिकारी, धर्माबाद पालिका
पाण्याची टाकी धुतली जात आहे जेथून पाणी घेतले जाते, तेथे प्रवाह नाही. पाणी डबक्यात जमा असल्याने ते खराब आहे. त्यामुळे दूषित पाणी येत असेल. इळेगाव गोदावरी येथील पंप खराब झाला आहे़ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.
- अफजल बेगम अब्दूल सत्तार, नगराध्यक्षा, धर्माबाद
इळेगाव गोदावरीचे पंप हाऊस खराब होऊन सात दिवस झाले आहे. थेट रत्नाळीला होणारा पाणी पुरवठा दूषीत होत होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्याची मागणी केली आहे.
-विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद