मागणी प्राथमिक आरोग्य केंद्राची, मिळाला निधी उपकेंद्राला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST2021-05-27T04:20:01+5:302021-05-27T04:20:01+5:30
मनाठा गाव आदिवासीबहुल असून, मुख्य व्यवसाय शेती आहे. सिंचनाची कोणतीही सोय नाही. शेतीचे उत्पन्न जेमतेमच आहे. राजकीय प्रभावही नाही. ...

मागणी प्राथमिक आरोग्य केंद्राची, मिळाला निधी उपकेंद्राला
मनाठा गाव आदिवासीबहुल असून, मुख्य व्यवसाय शेती आहे. सिंचनाची कोणतीही सोय नाही. शेतीचे उत्पन्न जेमतेमच आहे. राजकीय प्रभावही नाही. त्यामुळे विकासाच्या बाबतीत मनाठाची नेहमीच उपेक्षा केली जात आहे. मनाठा, सावरगाव, वरवंट, तरोडा, चोरंबा, गायतोंड-जगापूर, जांभळसावली, पळसवाडी, कनकेवाडी, आदी गावे जवळजवळ आहेत. जिल्ह्याचे ठिकाण ५०, तर तालुका ३० किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयात जाणे मोठे जिकिरीचे आहे. मनाठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले असते तर मोठी सोय झाली असती. खर्च कमी झाला असता, कोरोनाचा उपचार मिळाला असता. ह्या भागातील दहा खेड्यांत अद्यापही ॲंटिजन तपासणी नाही की, लसीकरण.
तामसा, आष्टी, वायफना या तीन गावांत १० कि.मी. अंतरावर तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. राजकीय पुढारी त्या त्या भागांतील असल्याने वजन खर्च करून त्यांनी गावांची सोय केली. मात्र मनाठा याबाबत उपेक्षित राहिला. गंगाधरराव चाभरेकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी आपल्या गावाकडे दवाखाना नेला. माजी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी प्रयत्न केले. मात्र दवाखाना आलाच नाही. शांताबाई जवळगावकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरली. लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शब्द दिला. मात्र तसे काही झाले नाही. मात्र ८० लाख रुपये उपकेंद्राला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.