पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह ४१ तासांनंतर सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:45 IST2019-09-04T13:39:10+5:302019-09-04T13:45:26+5:30
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी घेतला शोध

पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह ४१ तासांनंतर सापडले
लोहा (जि. नांदेड) : तालुक्यातील धानोरा (म) येथील दोघे नदीवरील पुलाच्या पाण्यात रविवारी रात्री वाहून गेले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस व ग्रामस्थांच्या तब्बल ४१ तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचेही शव १८ कि.मी. अंतरावर पांगरी शिवारातील नदी किनारी मिळून आले.
तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी नदी नाले ओढे भरून वाहिले. सुभाषनगर ते धानोरा (म) गावा दरम्यान नाल्यावरील पुलाहून पाण्याचा जोरदार प्रवाह होता. या प्रवाहात धानोरा (म) येथील बंडू एकनाथ बोंढारे व त्यांचा सोबती जयराम काशीनाथ भुजबळ हे दोघे मोटारसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. २ सप्टेंबर रोजी नांदेड मनपाचे जीवरक्षक दल घटनास्थळी येऊन दिवसभर शोध घेतला. परंतु शोध लागला नसल्यामुळे नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण केले होते.
३ सप्टेंबर रोजी सकाळपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने चार पथकाद्वारे शोध कार्य हाती घेतले. दुपारी बारा वाजेसुमारस जयराम भुजबळ यांचा मृतदेह घटनास्थळापासून १४ किमी अंतरावर बोरगाव शिवारातील सोयाबीनच्या शेतात आढळून आला तर बंडू बोंढारे यांचा मृतदेह दुपारी ३ वाजेसुमारस १८ किमी अंतरावरील पांगरी शिवारात नदीकाठी झुडपाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. तब्बल ४१ तासांच्या एसडीआरएफ दल, मनपाचे जीवरक्षक दल, लोहा पोलीस व स्थानिक नागरिकांच्या परिश्रमानंतर यश मिळाले. मदतकायार्साठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, यांच्यासह पथकाने परिश्रम घेतले.