हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला डेटा ? साडे चौदा कोटीच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:00 IST2021-01-22T18:58:44+5:302021-01-22T19:00:35+5:30
cyber crime शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले.

हॅकर्सला कमिशनवर पोहोचविला डेटा ? साडे चौदा कोटीच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात उलगडा
नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबाय बँकेत असलेले साडे चौदा कोटी रुपये हॅकर्सनी लंपास केले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी दोन महिलांसह एका संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या हॅकर्सला बँकेचा डाटा पुरविणारी एखादी टोळी असून, त्याचा बँकेशी संबध असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पाेहोचले आहेत.
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात वजिराबद पोलिसांनी दिल्ली येथून एकाला आणि शेजारील कर्नाटकमधून दोन महिलांना ताब्यात घेतले. यातील एका महिलेचे नायजेरीयन फ्रॉड करणाऱ्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. दिल्लीच्या मोहनपुरा भागात नायजेरियन बहुल वस्ती आहे. या ठिकाणाहूनच हॅकिंगचे प्रकार केले जातात.
तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे. आतापर्यंतच्या तपासावरून हॅकर्सला बँकेचा डेटा पुरविणारी एखादी टोळी असून, कमिशनवर ही टोळी हॅकर्सला ग्राहकांचा डेटा विकत असल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे, डेटा पुरविणाऱ्यामध्ये बँकेचाच कुणी सहभागी आहे काय? या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.