बिलोली शहरासह ग्रामीण भागातील ओसाड विहिरी बनल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:53 IST2019-02-11T00:53:24+5:302019-02-11T00:53:50+5:30
तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे.

बिलोली शहरासह ग्रामीण भागातील ओसाड विहिरी बनल्या धोकादायक
बिलोली : तालुक्यातील ग्रामीण तथा शहरी भागात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी विहिरी खोदण्यात आल्या होत्या. परंतु, दिवसेंदिवस जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्याने तसेच नागरिकांनी बोअरवेल जास्त घेतल्याने विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे. परिणामी, ओसाड पडलेल्या विहिरी लहान मुले तथा मोकाट गुराढोरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरत आहेत. त्या ओसाड विहिरीवर स्थानिक प्रशासनाने लोखंडी पिंजरे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.
३० ते ३५ वर्षांआधी पाण्याच्या दृष्टीने घरोघरी विहिरी खोदल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जनतेचे हित जोपासून ग्रामीण तथा शहरी भागात विहिरींची निर्मिती प्रशासनाने केली होती. त्यामुळे ज्याच्या घरी विहिरी नव्हत्या, त्यांना सार्वजनिक ठिकाणच्या विहिरींवरुन पाणी भरणे सोपे जात होते. पाणी भरण्याच्या दृष्टीने नागरिकांना विहिरींचे अनन्यसाधारण महत्त्व होते.
परंतु, दिवसेंदिवस विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेल्याने ग्रामीण तथा शहरी भागात बोअरवेलची निर्मिती करण्यात आली. त्याद्वारे पिण्याचे पाणी सार्वजनिक नळ तसेच घरगुती नळाद्वारे पोहोचविणे शक्य झाले. त्यामुळे सर्वात आधी घरगुती विहिरी पूर्णपणे आटल्याने त्या माती अथवा स्लब टाकून बुजविण्यात आल्या. परंतु, ग्रामीण तथा शहरी भागात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ओसाड विहिरी अजूनही उघड्याच आहेत. त्यावर कोणत्याच प्रकारचे लोखंडी पिंजरे नसल्याने मोकाट जनावरे, लहान मुलांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक बनल्या आहेत. धार्मिक सण जसे पतंग उत्सवात मुले पतंग उडवताना तसेच खेळताना इतके मग्न होतात की, पतंगाच्या मागे लागल्याने या ओसाड विहिरींचे शिकार बनतात.
या ओसाड विहिरी अतिशय जुन्या असल्याने काठ पूर्णपणे ढासाळले आहेत. परिणामी मुले, जनावरे त्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण तथा शहरी भागातील ओसाड विहिरी ज्या प्रशासनाच्या अंतर्गत येतात त्यावर त्यांनी लोखंडी पिंजरे टाकण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातून होत आहे.