ओल्या दुष्काळाने साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; दीड हजार गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 07:58 PM2019-11-02T19:58:51+5:302019-11-02T20:00:56+5:30

सोयाबिनचे ८० टक्के तर कापसाचे ४० टक्के नुकसान

Damage to crops of five and a half lakh farmers in Nanded | ओल्या दुष्काळाने साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; दीड हजार गावांना फटका

ओल्या दुष्काळाने साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; दीड हजार गावांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदेड जिल्ह्यात अवेळी पाऊसाने अतोनात नुकसान  जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल पाठविला

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. १८ ते २८ आॅक्टोबर दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबिन ८० टक्के, कापूस ४० तर ज्वारी पिकाचे ६० टक्के नुकसान झाले आहे. एकूण खरिपातील ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी प्रकाशमान नव्हे तर अंधकारच घेवून आली. यावर्षी सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबिन, कापूस आदी पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात यंदा प्रथमच कापसापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. 

दरम्यान सोयाबिन पिकासाठी पोषक असलेले वातावरण मिळाल्याने सर्वत्रच सोयाबिन जोमात आले होते. शेतकऱ्यांचे नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे कापूस व सोयाबिन यांच्यावरच शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणार होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. दसऱ्यानंतर सोयाबिन काढणीला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी सोयाबिनला उताराही चांगला आला होता. तर काही ठिकाणी किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबिनचे नुकसान झाले होते. तरी सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबिनच्या उत्पादित मालाची अपेक्षा होती. अखेर परतीच्या पावसाने ऐन काढणीच्या वेळेला हजेरी लावली. त्यामुळे शेतातील काढलेल्या सोयाबिनचे मोठे नुकसान झाले. १८ आॅक्टोबर पासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून सलग दहा ते पंधरा दिवसापासून पाऊस चालूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. या पावसामुळे सोयाबिनसह कापूस, ज्वारी, तूर, मका, हायब्रीड या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

जिल्ह्यात सोयाबिनची पेरणी ३ लक्ष ७० हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. त्यापैकी २ लाख ४१ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रातील सोयाबिनचे नुकसान झाले आहे तर कापसाची पेरणी २ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावर कापसाचे नुकसान झाले आहे.  या पावसाने फुललेल्या कापसाचे बोंडे ओली झाली असून ती गळून पडली आहे तर कच्चे बोंडे सडली आहेत. ज्वारी पिकाची ३५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी २२ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे नुकसान झाले आहे. एकूण खरिप पेरणी क्षेत्र ७ लाख ५८ हजार असून नुकसान झालेले ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ओल्या दुष्काळाने १ हजार ४९० गावांना फटका
जिल्ह्यातील १ हजार ४९० गावांना  पावसामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये नांदेड, कंधार, देगलूर, मुखेड, किनवट, हदगाव तालुक्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे.दरम्यान, गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांच्या मदतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृृषी अधिकारी आऱ बी़ चलवदे यांनी दिली़ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे  शेतकऱ्यांच्या पिकांना झळ बसली आहे. यामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या असे- नांदेड २८ हजार ४६४, अर्धापूर- २२ हजार २७, मुदखेड - १५ हजार २१, कंधार- ६४ हजार ८७२, लोहा- ६२ हजार ३५१, देगलूर- ३३ हजार ६४५, मुखेड- ३१ हजार ७०२, नायगाव- ५० हजार ९१४, बिलोली- २९ हजार १३०, धर्माबाद- २६ हजार ८३१, किनवट- ४ हजार ३३, माहूर- १८ हजार १८०, हिमायतनगर- २७ हजार ५५५, हदगाव- ५१ हजार ५११, भोकर- ४६ हजार ६१२ आणि उमरी ३० हजार ७१५ असे एकूण ५ लाख ४३ हजार ५६३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

माहिती अहवाल तयार
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून या पिकांची पाहणी करण्यात आली आहे. १८ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे़  त्यानुसार सोयाबिन, कापूस, ज्वारी, तूर, मका या नुकसान झालेल्या पिकांच्या माहितीचा अहवाल तयार करुन शासनाला पाठविला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली.

Web Title: Damage to crops of five and a half lakh farmers in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.