गौतम लंके ।कासराळी : ज्ञान आणि नियोजन यांचे मिश्रण कृतीत उतरले तर अपेक्षेहून अधिक यश मिळते असाच काहीसा अनुभव कासराळी येथील शेतक-याला आला़ कलिंगडात आंतरपीक म्हणून घेतलेल्या हिरव्या मिरचीतून दोन एकरात सात लाखांचे उत्पन्न अवघ्या तीन महिन्यांत मिळविले. कलिंगड व मिरची असा दुहेरी लाभ मिळाला असून शेतक-याच्या या बंपर मिरची क्रॉपने तिखट मिरची झाली गोड अशीच काहीशी प्रचिती शेतकºयाने आपल्या उत्पादनातून दिली आहे.बिलोली तालुक्यातील कासराळी येथील उत्तम शेती व प्रयोगशील शेतकरी अशी ओळख असलेल्या भागवत मनोहर लोकमनवार शेतीत नवनवीन प्रयोग करुन आर्थिक लाभ मिळवून चर्चेत असतात. लोकमनवार यांनी साधारणत: सहा वर्षांपर्वी कलिंगडाची लागवड केली होती. आज नेपाळमधील काठमांडू, जम्मू आणि हैदराबाद येथे जाणारे येथील कलिंगड त्यांच्याच प्रयोग आणि प्रयोजनातून झाले. थोडक्यात, कासराळी व परिसरात त्यांनी कलिंगडाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांचाच कित्ता गिरवून जवळपास ३०० एकरांत इतर शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली होती. कालपरत्वे यात मोठी वाढ होते. याच कलिंगडात लोकमनवार यांनी हिरवी मिरची पिकाचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन स्वत:च्या दोन एकर शेतीत कलिंगड पिकांतच मिरचीचे आंतरपीक घेतले.या आंतरपिकात कलिंगडाचे दोन एकरात तीन लाखांचे उत्पन्न यापूर्वीच मिळाले़ मात्र यामध्येच आंतरपीक घेतलेल्या हिरवी मिरचीचे प्रचंड उत्पादन झाले. दोन एकरांत सात लाखांचे मिरचीचे उत्पादन झाले.९० दिवसांच्या या पिकाची योग्य निगा त्यांनी राखली. सध्या हिरव्या मिरचीला बाजारपेठेत ८० रुपये किलोचा दर मिळतो. व्यापारी लोकमनवार यांच्या शेतीतून ४० ते ५० रुपये दराने जागेवरुनच घेऊन जातात. पावसाळ्यात मिरचीचे अल्प उत्पादन आणि मागणी जास्त असल्याने लोकमनवार यांना भावही चांगलाच मिळाला.एकीकडे पारंपरिक पिकांची पेरणी व लागवड करण्याची आता धामधूम सुरु असताना लोकमनवार यांच्यासारखे शेतकरी आंतर पिकातल्या मिरची लागवडीतून सात लाखांचे उत्पन्न काढून मोकळेही झाले. सध्या पावासाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा कसलाही परिणाम झाला नाही.
आंतरपिकातील मिरची लागवडीने शेतकऱ्याला झाला दुहेरी लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:54 IST
कलिंगड व मिरची असा दुहेरी लाभ मिळाला असून शेतक-याच्या या बंपर मिरची क्रॉपने तिखट मिरची झाली गोड अशीच काहीशी प्रचिती शेतकºयाने आपल्या उत्पादनातून दिली आहे.
आंतरपिकातील मिरची लागवडीने शेतकऱ्याला झाला दुहेरी लाभ
ठळक मुद्देतीन महिन्यांत दोन एकरमध्ये शेतक-याने मिळविले ७ लाखांचे उत्पन्न