गाव विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा - वर्षा ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:27+5:302021-02-05T06:09:27+5:30
नांदेड- गावस्तरावर विविध अभियान व उपक्रम राबविले जातात. परंतु गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे ...

गाव विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा - वर्षा ठाकूर
नांदेड- गावस्तरावर विविध अभियान व उपक्रम राबविले जातात. परंतु गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा गाव सुंदर गाव’ व ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमातंर्गत ३ फेब्रुवारी रोजी नांदेड येथील हॉटेल अतिथी येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक पावडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले.
वर्षा ठाकूर म्हणाल्या, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान उपक्रमातंर्गत सन २०२१-२२ वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करतांना गावातील शेतकरी, महिला, युवक-युवती, किशोरवयीन मुली, महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय करुन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. तसेच गावची सांस्कृतिक परंपरा, भौगोलिक परिस्थितीचा देखील आराखडा तयार करतांना विचार केला पाहिजे. ग्राम विकासासाठी विस्तार अधिकारी हे पद महत्वाचे असून त्यांनी हिवरेबाजार, पाटोदा व राळेगणसिध्दी सारखे गावे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन गावस्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक करावा असेही वर्षा ठाकूर म्हणाल्या.
प्रशिक्षण कार्यशाळेत जीपीडीपी प्रक्रिया, ग्रामपंचायतीची संसाधने, परिस्थितीचे विश्लेषण लोकसहभागावर आधारित नियोजन प्रक्रिया, मानव शाश्वत विकास मूल्यावर आधारित जीपीडीपी आराखडा व कलम ४५ सूचीचा वापर, प्रकल्प अहवाल व तांत्रिक मान्यता, विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी, आदर्श गाव संकल्पना राबविणे आदी विषयावर प्रशिक्षक अमरसिंह आईलवार, कैलास यसगे, बालाजी गवलवाड, कान्हा शिरसाठ यांनी प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभाग, शिक्षण, कृषी, महिला बालकल्याण, सांख्यिकी व आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.