मुखेड तालुक्यात प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 19:33 IST2019-02-22T19:32:47+5:302019-02-22T19:33:28+5:30
दोघे भिन्न जातीचे असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा

मुखेड तालुक्यात प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
मुखेड (जि. नांदेड) : मुखेड तालुक्यातील येवती गावापासून २ कि़मी़ अंतरावर असलेल्या कासारवाडी गावाच्या शिवारात एका प्रेमी युगुलाने झाडाला गळफास घेऊन २१ फेब्रुवारीच्या रात्री जीवनयात्रा संपविली.
कोळनूर (ता.जळकोट जि.लातूर) येथील रहिवासी गणपती ऊर्फ पारस निवृत्ती नरवटे अंदाजे (वय २५) व त्याच गावातील धनश्री माधव चोले (अंदाजे वय २०) या दोघांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री मामा खुशाल देवकत्ते यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला कासारवाडी शिवारात येऊन गळफास घेतला़ २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दोघांचे मृतदेह झाडाला लटकत असल्याचे जनावरे चारणाऱ्या महिलेच्या निदर्शनास आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रकाश सांगळे, मिथून सावंत,जमादार सुनील पांडे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दुपारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मयत गणपती नरोटे हा एम.पी.एस.सी. व पोलीस भरतीची तयारी करत होता तर मयत मुलगी धनश्री पॉलिटेक्निक कॉलेज नांदेड येथे कॉलेजला होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र ते दोघे भिन्न जातीचे असल्याने घराच्यांचा त्यांना विरोध होता, असे समजले. यातूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा, अशी चर्चा आहे. मुखेड पोलिसांनी राम देवकत्ते यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुनील पांडे तपास करीत आहेत.