मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करा-चव्हाण
By Admin | Updated: May 14, 2014 01:15 IST2014-05-14T00:10:35+5:302014-05-14T01:15:14+5:30
शेतकर्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या.
मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करा-चव्हाण
नांदेड : शेतकर्यांना पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील मंडळनिहाय पाऊस मोजणीयंत्र दुरुस्त करण्याच्या सूचना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे १३ मे रोजी खरीप हंगाम २०१४ ची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी शेतमाल उतरविण्यासाठी एका रॅक पाँईटवर लोड येत असल्याने आणखी २ ते ३ रॅक पाँईट वाढवावेत, असेही म्हटले. पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय बैठका घेवून खरिपाचे नियोजन करावे. तसेच इतर विभागाशी समन्वय साधण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन शेतीविषयक आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. खरीप आढावा बैठकीत खत-बियाणासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबिवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. खरिपासाठी जिल्ह्याला १ लाख ९५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणाची आवश्यकता आहे. महाबीज व एनएसई यांच्याकडून १३४०० क्विंटल, खाजगी कंपन्याकडून ६२ हजार क्विंटल तर शेतकर्यांकडील ७२४५२ क्विंटल असे एकूण १ लाख ४७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. कापसाच्या अजित-१५५ या वाणाची ४ लाख ९७ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली असून सदर कंपनीकडून ९५ हजार पाकिटे उपलब्ध होणार आहेत. ७ मे पर्यंत २०९८० पाकिटे वितरित केली आहेत. यासाठी वाणाच्या तोडीचे उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असल्यामुळे शेतकर्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर वाणांचा वापर करावा, असे कृषी विभागाने आवाहन केले. खरिपासाठी २ लाख ५४ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून पैकी २ लाख ६ हजार मे.टन खत उपलब्ध होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत ३७ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असल्यामुळे खताचा कोणत्याही प्रकारे तुटवडा भासणार नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. याशिवाय यावर्षीपासून केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अभियान स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. यात अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, गळीतधान्य अभियान, कोरडवाहू शेती अभियान तसेच फलोत्पादन अभियानाचा समावेश राहणार आहे. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आमदार वसंतराव चव्हाण, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. हणमंतराव पाटील, जि. प. उपाध्यक्ष प्रकाश राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, व्यापारी असोसिएशनचे मधुकर मामडे, कृषी विकास अधिकारी एम. टी. गोंडेस्वार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्यासह इतर सर्व विभागाचे अधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पडवळ यांनी पॉवरपॉईंटद्वारे सर्व योजनांची माहिती दिली. (प्रतिनिधी)