CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:43 IST2020-05-03T13:42:40+5:302020-05-03T13:43:48+5:30
रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' झाला आहे.

CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
नांदेड : नांदेड शहरात आजपर्यंत कोरोनाचे 29 रुग्ण आढळले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पिरबुऱ्हाणनगर भागातील एका महिलेचा स्वॅब घेण्यात आला होता. या महिलेचा रविवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काही वेळातच या महिलेचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये कोरोना बळींची संख्या आता तीन वर पोहचली आहे. दरम्यान रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' झाला आहे.
रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते असे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी त्या महिलेचे स्वॅब घेतले असता त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वी पिरबुऱ्हाण नगर आणि सेलू येथील दोघांचा कोरोना मुले मृत्यू झाला होता.
कोरोना वायरसने हातपाय पसरले!
गेल्या दोन दिवसात नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा ग्राफ वाढत चालल्याचे दिसून येते.शनिवारी गुरुद्वारा लंगरसाहिब परिसरात कार्यरत २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण असताना रविवारी कोरोना रुग्णाच्या संख्येत तीनने वाढ झाली. यापैकी दोन जण हे यात्रेकरूंना पंजाबला सोडून आलेले वाहनचालक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोना वायरसने शहरात हातपाय पसरवणे सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.