CoronaVirus : शीख भाविकांच्या स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर; पंजाब सरकारच्या ८० बस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:50 IST2020-04-27T13:47:04+5:302020-04-27T13:50:28+5:30
लंगर साहिब गुरुद्वाराच्या वतीने १४ बस व १२ टेम्पो ट्रॅव्हल्स भाड्याने करून यात्रेकरूंना रवाना करण्यात आले.

CoronaVirus : शीख भाविकांच्या स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर; पंजाब सरकारच्या ८० बस दाखल
नांदेड : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना नेण्यासाठी पंजाब सरकारने सोडलेल्या ८० बसेस नांदेडात दाखल झाल्या आहेत़ या बसच्या माध्यमातून नांदेडात अडलेल्या पैकी उर्वरित जवळपास तीन हजार प्रवासी पंजाबकडे रवाना होणार आहेत़
श्री हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी नांदेड येथे आलेल्या पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली येथील भाविक लॉकडाऊनमुळे नांदेडातच अडकून पडले होते़ यामध्ये बहुतांश भाविक हे चाळीसीच्या वरचे असल्याने त्यांच्या आरोग्याचेही प्रश्न होते़ मागील दीड महिन्यांपासून सर्व भाविकांना मुख्य गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वाराच्या यात्री निवासमध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती़ परंतु, बरेच दिवस झाल्याने सदर भाविकांना आपल्या गावी जाण्याची ओढ लागली होती़ त्याअनुषंगाने गुरूद्वारा बोर्डासह स्थानिक नेत्यांनी भाविकांच्या वाहतूकीसाठी आणि त्यांना पंजाबमध्ये पोहोचविणे कसे शक्य होईल, यासाठी सर्व प्रयत्न केले़ दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीने सर्व भाविकांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली़
लंगर साहिब गुरुद्वाराच्या वतीने १४ बस व १२ टेम्पो ट्रॅव्हल्स भाड्याने करून यात्रेकरूंना रवाना करण्यात आले़ या गाड्यांना लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्यासह खा़ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सचखंड गुरुद्वाराच्या वतीने तेथे थांबलेल्या ३३० यात्रेकरूंना घेऊन १० बसेस पंजाबला रवाना केल्या होत्या, त्या पंजाबला पोहचल्या आहेत अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार भुपिंदरसिंघ मनहास यांनी दिली़
आजपर्यंत ९०० भाविक रवाना
आतापर्यंत जवळपास ९०० भाविक पंजाबला रवाना झाले असून आणखी जळपास ३ हजार यात्रेकरू शिल्लक आहेत. त्यांना नेण्यासाठी पंजाब सरकारने ८० बसेस पाठवल्या आहेत. त्या सोमवारी सकाळी नांदेड येथे लंगर साहिब गुरुद्वारामध्ये आल्या असून सायंकाळी भाविकांना घेऊन पंजाब ला रवाना होणार आहेत़