coronavirus : नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:36 IST2020-06-03T16:36:25+5:302020-06-03T16:36:50+5:30
बाधितामध्ये ११ रुग्ण हे नांदेड शहरातील देगलूरनाका परिसरातील आहेत. तर नऊ जण नई आबादी, शिवाजीनगर येथील

coronavirus : नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ
नांदेड : बुधवारचा दिवस नांदेडसाठी धक्कादायक ठरला. एकाच दिवसात २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. नव्याने आढळून आलेल्यांपैकी नऊ रुग्ण हे शिवाजीनगर व नई आबादी भागातील आहेत तर ११ रुग्ण हे देगलूरनाका परिसरातील आहेत. या नव्या २३ रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७५ एवढी झाली आहे.
बुधवारी सकाळी १०१ अहवालांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यातील एक महिला रुग्ण नांदेड शहरातील इतवारा भागातील रहिवासी आहे तर दुसरा २१ वर्षीय रुग्ण मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील रहिवासी असल्याचे पुढे आले. या दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १५४ वर पोहंचली होती. या धक्क्यापाठोपाठ आणखी एक धक्का सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याला सहन करावा लागला.
सायंकाळी १३२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील तब्बल २१ नमुने अहवाल बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ९९ अहवाल निगेटिव्ह आले तर ६ अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आणि ६ अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. या नव्या २१ बाधितामध्ये ११ रुग्ण हे नांदेड शहरातील देगलूरनाका परिसरातील आहेत. तर नऊ जण नई आबादी, शिवाजीनगर येथील बाधित कामगार कुटुंबातील सदस्य व त्यांचे नातेवाईक असल्याचे समजते. तर एक रुग्ण हा देगलूर तालुक्यातील आमदुरा येथील आहे. या नव्या २३ रुग्णामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७५ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आठ रुग्णांचा यापूर्वीच उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झालेला असून १२१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.