Corona Virus : भिक्षा मागून तरूणांनी जमवली मदत; पालावरील भटक्यांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:29 IST2020-03-29T17:07:25+5:302020-03-29T17:29:51+5:30
हातावर पोट असणारे भटके रस्त्यावर आले आहेत

Corona Virus : भिक्षा मागून तरूणांनी जमवली मदत; पालावरील भटक्यांना केले जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
नांदेड: पोटासाठी भटकंती करून उदरनिर्वाह करणा-यांचे संचार बंदीने खूप मोठे हाल होत आहेत. खायला अन्न नाही, बाहेर भिक्षा मागता येईना, हाताला काम अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जे लोक भिक्षा मागतात अशा या भटक्या बांधवांसाठी जुन्या अर्धापुर शहरातील तरूणांनी घरोघरी जाऊन धान्य जमा केले. उपाशीपोटी जगणा-या बांधवांना गहू तांदूळ, तेल, तिखट मिरची व मीठ हाळद साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचे शनिवारी (दि.२८) वाटप करण्यात आले.
अर्धापूर शहरात विविध भागात भटक्यांनी ठाण मांडले आहे. सुमारे ५५ कुटूंबाला धान्य वाटप कर आला. या मदतीने हातावर पोट असणाऱ्या बांधवांना खुप मोठा आधार मिळाला.
अर्धापूर शहरांत अर्धापूर नांदेड रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत मराठवाडासह विदर्भ आदी भागातील भटकंती करून उदरनिर्वाह करणारे मजुर पालामध्ये थांबले आहेत. यात मुर्तीकार, फोटो, काचेचे मंदिर विकणारे, भिक्षा मागणारे यांचा समावेश आहे. कोरोना मुळे संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पालामध्ये राहणाऱ्या बांधवांसाठी पुण्यजागर प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, गजानन मेटकर, गुणवंत विरकर, नाना डक, शिवराज भुसारे यांनी जुन्या अर्धापुर शहरातील वाडीकर गल्ली,रामनगर, गवळीगल्ली, ब्राह्मण गल्ली, केशव राज नगर आदी भागात जाऊन धान्य जमा केले. या मदत फेरीवाला नागरिकांनी खुप मोठा प्रतिसाद दिला. भटक्यांच्या पालावर जावून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे, आरोग्य अधिकारी मदन डाके, सुहास गायकवाड, रामलींग महाजन आदी उपस्थित होते. या मदत फेरीत सुरेश डक, आकाश गव्हाणे, शिवाजी पवार, बलवीर देशमुख, नवनाथ राऊत, लक्ष्मण गाढवे यांनी सहभाग नोंदविला.