मनोरुग्णांना कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:01+5:302021-02-05T06:10:01+5:30
नांदेड : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद पडलेले व्यवहार आता कुठे सुरळीत होत आहेत; परंतु या धक्यातून अनेकजण ...

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका
नांदेड : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद पडलेले व्यवहार आता कुठे सुरळीत होत आहेत; परंतु या धक्यातून अनेकजण अद्यापही सावरले नाहीत. कोरोनामुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून त्यामुळे अनेकजणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातही जे मनोरुग्ण उपचारानंतर बरे झाले होते, तेही लॉकडाऊन, बेरोजगारी या प्रकारामुळे पुन्हा मनोरुग्णालयाची पायरी चढत आहेत.
कोरोनामुळे अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात अडकून पडावे लागले. भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे. त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे. मनातील ही घुसमट बाहेर काढण्याचा मार्ग मिळत नसल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दररोज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ३० टक्केहून अधिक वाढली आहे.
मनोरुग्णांमध्ये कुठला त्रास वाढला
आजघडीला मनोरुग्णांना पॅनिक अटॅक, ओसीडी अशाप्रकारचे आजार होत आहेत. पॅनिक अटॅक हा भीतीचा आजार आहे. व्यवसाय, भविष्याची अनिश्चितता यामुळे रुग्णांच्या मनात एक भीती निर्माण होते. समोर येणारा प्रत्येकजण आपल्याला धोका पोहोचवेल की काय? अशी भीती त्यांना वाटते. साधारणत: कोरोनापूर्वी एका रुग्णालयात दररोज ३० मनोरुग्ण येत होते. ही संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या काळात व्यसनाधीनताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोनामुळे मनोरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. व्यवसाय, बेरोजगारी, भविष्याची चिंता यामुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. यापूर्वी औषधोपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांनाही लॉकडाऊनच्या काळात पुन्हा त्रास सुरू झाला आहे. तसेच नव्याने येणारे रुग्णही वाढले आहेत. त्यातही विशेष म्हणजे कोरोनामुळे व्यसनाधीनतेत वाढ झाली आहे. ताणतणाव दूर करण्यासाठी अनेकजण अल्कोहोलचा वापर करीत आहेत. रुग्णांनी न घाबरता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
-डॉ. रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ