'गावात कोरोना वाढतोय आणि तुम्ही मॅच पाहता'; आयपीएल पाहणाऱ्या सरपंचासह भावाला दोघांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 16:58 IST2021-04-27T16:52:14+5:302021-04-27T16:58:56+5:30
शरद भगवान हुंबाड हे २४ एप्रिल रोजी रात्री सरंपच भाऊ असलेल्या गुरुनाथ हुंबाड यांच्या घरी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी गेले होते.

'गावात कोरोना वाढतोय आणि तुम्ही मॅच पाहता'; आयपीएल पाहणाऱ्या सरपंचासह भावाला दोघांची मारहाण
नांदेड : गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरपंच आयपीएलची मॅच पाहतोय याचा राग मनात धरून दोघांनी सरपंच आणि त्यांच्या भावाला जबर मारहाण करून कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना २४ एप्रिल रोजी नंदनवन गावात घडली.
शरद भगवान हुंबाड हे २४ एप्रिल रोजी रात्री सरंपच भाऊ असलेल्या गुरुनाथ हुंबाड यांच्या घरी आयपीएलची मॅच पाहण्यासाठी गेले होते. यावेळी निवडणुकीतील विरोधक असलेले दिगांबर गोविंद भागानगरे आणि मोहन भागानगरे हे त्यांच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी गावात एवढे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरपंच काय करतोय असे म्हणून ओरडण्यास सुरुवात केली.
तसेच सरपंचाला घराबाहेर येण्यास सांगितले. परंतु सरपंच गुरुनाथ हुंबाड हे बाहेर आले नाहीत. त्यानंतर दोघे आरोपी घरात शिरले. त्यांनी शरद हुंबाड आणि गुरुनाथ हुंबाड या दोघांना मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी झाले. या प्रकरणात उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि जमदाडे हे करीत आहेत.