कोरोना संकटात मनपाची करवसुली घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:39+5:302021-05-27T04:19:39+5:30
शहरात जवळपास १ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून चालू कराची मागणी ही ६० कोटी होती, तर एकूण ...

कोरोना संकटात मनपाची करवसुली घटली
शहरात जवळपास १ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून चालू कराची मागणी ही ६० कोटी होती, तर एकूण मागणी ही १५४ कोटींची आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी महापालिकेने
करवसुलीसाठी स्वतंत्र पथकांची स्थापना केली होती. त्याचवेळी क्षेत्रीय कार्यालयांना करवसुलीचे उद्दिष्टही दिले होते. त्या उद्दिष्टानुसार काम सुरू झाले असतानाच कोरोनाचा प्रभाव वाढला. त्यामुळे महापालिकेची
करवसुलीही थंडावली. मनपाची पथके ही कोरोना नियंत्रणात गुंतली. त्यात कोरोना तपासणीसह कोरोना नियमावलींच्या पालनासाठी ही पथके काम पाहू लागली.
महापालिकेने मागील थकबाकीवरील शास्ती माफीचीही घोषणा केली. या घोषणेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. २०२० - २१मध्ये चालू कराची मागणी ही ६० कोटी होती. ५५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
मार्चअखेरपर्यंत महापालिकेने ४२ कोटी २६ लाख रुपये करवसुली करण्यात यश मिळवले. कोरोनाची दुसरी लाट आली नसती तर ५५ लाखांचे उद्दिष्ट महापालिकेने पूर्ण केले असते. २०१९ - २० मध्येही ऐन मार्चमध्येच कोरोनाचा
उद्भव झाला होता. त्यावेळी जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका महापालिकेच्या करवसुली मोहिमेला बसला होता. कोरोना संकटापूर्वी महापालिकेने २०१८-१९ मध्ये ४८ कोटी ५९ लाख रुपये कर वसूल केला होता.
करवसुलीला बसलेल्या फटक्याबाबत आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कराचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे. कर भरण्यासाठी मालमत्ता धारकांसाठी ऑनलाईनचा सोपा
पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील दैनंदिन कामे करण्यासाठी निधीची गरज असते. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत करवसुलीच आहे. त्यामुळे करवसुली वेळेत होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
दुसरीकडे भाजप व शहरातील काही इतर संघटनांनी कोरोना संकटात महापालिकेने मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी केली होती. मात्र, ही मागणी अव्यवहार्य असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.