नांदेड गुरुद्वारा बोर्डाला मिरवणुकीची सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 20:02 IST2020-10-24T20:01:20+5:302020-10-24T20:02:52+5:30
हा संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ शूटिंग करावे, मिरवणुकीची सुरुवात आणि शेवट कुठे होईल याचा उल्लेख हमीपत्रात करावा.

नांदेड गुरुद्वारा बोर्डाला मिरवणुकीची सशर्त परवानगी
औरंगाबाद : नांदेड येथील शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब बोर्डाला परंपरेनुसार दसऱ्याच्या मिरवणुकीला औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी सशर्त परवानगी दिली.
२४ व्यक्ती, ५ घोडे, पालखी आणि ऐतिहासिक निशाण साहिब यासह दोन खुल्या ट्रकमधून मिरवणूक काढण्यास खंडपीठाने परवानगी दिली. एका ट्रकमध्ये पालखी आणि ऐतिहासिक निशाण साहेब यासोबत १६ लोक, तर दुसऱ्या ट्रकमध्ये गुरू ग्रंथसाहिब आणि ५ जिवंत घोडे, एका घोड्यावर ढोलक घेतलेला स्वार आणि इतर ४ घोड्यांना धरून खाली उभे राहणारे ४ जण, तसेच कीर्तन जथामधील ३ लोक, असे ८ जण राहतील. ट्रकच्या मागे आणि पुढे पोलिसांची पायलट आणि एस्कॉर्ट जीप राहील. हा जुलूस सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत पूर्ण करावा. मिरवणुकीच्या मार्गावर गर्दी नसावी, असे खंडपीठाने बजावले आहे.
हा संपूर्ण सोहळ्याचे व्हिडिओ शूटिंग करावे, मिरवणुकीची सुरुवात आणि शेवट कुठे होईल याचा उल्लेख हमीपत्रात करावा. कोणत्याही शर्तीचा भंग झाल्यास आपण स्वतः त्याला व्यक्तिशा जबाबदार राहू, अशी लेखी हमी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव बुंगाई यांनी द्यावी, अशी अट खंडपीठाने घातली.