सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:58 IST2019-06-30T00:48:59+5:302019-06-30T00:58:16+5:30
जिल्ह्यातील गडगा, कौठा, कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात सलग दुस-या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदले असून, पेरणीच्या कामाला लागले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम पाऊस
नांदेड : जिल्ह्यातील गडगा, कौठा, कोळगाव, गुजरी, बोधडी परिसरात सलग दुस-या दिवशी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी आनंदले असून, पेरणीच्या कामाला लागले आहेत.
गडगा परिसरात ३८ मि.मी. पाऊस
गडगा : २९ जूनच्या सकाळी सहा वाजेपर्यंत मांजरमच्या प्रर्जन्यमापकावर ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदा पावसाने विलंब केल्याने कापसाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल आहे. चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतक-यांची चिंता वाढली होती. पाऊस तर नाहीच पण कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या.
बोधडी परिसरात पाऊस
बोधडी : बोधडी व परिसरात २८ रोजी पाऊस झाल्याने शेतकरी आनंदित झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात शेतकºयांनी धूळपेरणी केली होती़ यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता़ २८ रोजी रात्री बोधडी व परिसरात एक ते दीड तास पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाला. बोधडी व परिसरात पाऊस झाल्याने शेतकरी बोधडी बाजारपेठेत खते व बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत.
मेघगर्जनेसह दमदार पाऊस
आरळी : बिलोली तालुक्यातील कोळगाव, गुजरीसह परिसरात २८ रोजी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह व मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. कोळगाव, गुजरी, कौठा, आरळी, कांगठी, खपराळा, हरनाळा, तोरणा, दुगाव, कुंभारगाव आदी गावांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. जवळपास दोन तास पाऊस पडला. या पावसाने शेतकरी आनंदित झाले असून, आता पेरणीस सुरुवात करण्यास शेतकरी आतुर झाला.
खोळंबलेल्या पेरण्या सुरु
कौठा : जून महिन्याच्या शेवटी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकºयांत आनंद पसरला आहे़ पेरणीयोग्य पाऊस झाल्याने रखडलेली पेरणी जोरदार सुरु झाली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी पेरणीकडे शेतकरी वळला आहे़ शनिवारी सकाळपासून काही शेतकरी कापूस लागवडीच्या घाईगडबडीत दिसत होते़ कृषी सेवा केंद्रावर बियाणे खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती़ सकाळपासून आभाळ दाटून आल्याने शेतकरी दिवस निघताच पेरणीसाठी धावाधाव करत होते़ दुपारी दोन वाजताच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पेरणी थांबवावी लागली़ शनिवार आठवडी बाजारात मात्र शुकशुकाट दिसून आला़