नांदेड : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या नियमांत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत ही सवलत मिळणार नसून, ज्येष्ठ नागरिकांना आता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच आपला हक्क बजावावा लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना केंद्रावर कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गरोदर महिला आणि लहान मुले सोबत असलेल्या मातांसाठीही स्वतंत्र सोयी-सुविधा पुरवल्या जातील. वयोवृद्ध मतदारांनी उत्साहाने प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत असले तरी, घरून मतदानाची सुविधा बंद झाल्याने ज्येष्ठांना आता प्रत्यक्ष केंद्राची पायरी चढावी लागेल.
१) शहरात ६०० मतदान केंद्रेनिवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण शहरात एकूण ६०० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना त्यांच्या घराजवळील परिसरात मतदान करणे सोपे जावे, या उद्देशाने ही विभागणी केली आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२) ८५ वर्षांवरील वृद्धांना केंद्रावरच यावे लागणारयावेळी महानगरपालिका निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नसेल. त्यामुळे या वयोगटातील सर्व मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच आपला मतदानाचा हक्क बजवावा लागणार आहे. प्रशासनाने ही सुविधा यावेळी रद्द केली आहे.
३) ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश करताना अडचण येऊ नये म्हणून 'रॅम्प' तयार करण्यात आले आहेत. ज्यांना चालणे शक्य नाही, अशा व्यक्तींसाठी प्रत्येक केंद्रावर व्हीलचेअरची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे शारीरिक मर्यादा असलेल्या मतदारांना सुलभपणे मतदान करता येईल.
४) मतदानात प्राधान्यक्रम मिळणारज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये, यासाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल. अशा मतदारांना रांगेत न थांबवता थेट मतदान कक्षात प्रवेश देऊन त्वरित मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
५) वीज, पिण्याचे पाणी, शौचालय उपलब्धमतदानाच्या दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक केंद्रावर वीज, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. उन्हाचा किंवा इतर त्रासाचा विचार करून सावलीची आणि प्राथमिक आरोग्य सुविधेचीही तरतूद प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
६) गरोदर, लेकुरवाळ्या महिलांचीही सुविधामतदान केंद्रावर येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुले सोबत असलेल्या मातांसाठी विशेष सोयी करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आणि रांगेतून सवलत दिली जाणार आहे. जेणेकरून महिलांना कोणत्याही त्रासाशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता येईल.
Web Summary : Nanded municipal elections: Citizens above 85 can't vote from home. Facilities like ramps and wheelchairs are available at the 600 polling centers. Priority lines, water, and restrooms are also provided.
Web Summary : नांदेड नगर निगम चुनाव: 85 वर्ष से अधिक उम्र के नागरिक घर से मतदान नहीं कर सकते। 600 मतदान केंद्रों पर रैंप और व्हीलचेयर जैसी सुविधाएं उपलब्ध हैं। प्राथमिकता लाइनें, पानी और शौचालय भी उपलब्ध कराए गए हैं।