' तपासणी पुन्हा करा, मी निगेटिव्ह'; दारू पिऊन डॉक्टरांसोबत हुज्जत घालणाऱ्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:49 IST2021-04-08T19:47:31+5:302021-04-08T19:49:08+5:30
रूग्णाने डाॅक्टरांसह इतर कर्मचाऱ्यासोबत घातलेल्या या गोंधळामुळे आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यातही घबराटीचे वातावरण पसरले हाेते.

' तपासणी पुन्हा करा, मी निगेटिव्ह'; दारू पिऊन डॉक्टरांसोबत हुज्जत घालणाऱ्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल
नांदेड : काेराेना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गृह विलगीकरण करण्यात आलेल्या रूग्णाने आष्टी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येऊन डाॅक्टरांशी हुज्जत घातली. या प्रकरणी तामसा पाेलीस ठाण्यात बाधित रूग्णांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव तालुक्यात बुधवारी ही घटना घडली.
आष्टी येथील तरूण पाॅझिटिव्ह असल्याचे काेराेना तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर या तरूणाला गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या हाेत्या. मात्र, ७ एप्रिल राेजी सदर रूग्णाने मद्य प्राशन करून अचानक आष्टी येथील प्राथमिक आराेग्य केंद्र गाठले. यावेळी केंद्रामध्ये प्रवेश करून माझी काेराेनाची तपासणी पुन्हा करा, मी निगेटिव्ह आहे, असे म्हणत प्राथमिक आराेग्य केंद्रात गाेंधळ घातला. यावेळी आराेग्य केंद्रातील कर्मचारी संताेष गजभारे यांनी सदर बाधित रूग्णाला समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, उलट बाधित रूग्णाने गजभारे यांची गच्ची धरून शिवीगाळ केली. तसेच आराेग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घातली. या बाधित रूग्णाने डाॅक्टरांसह इतर कर्मचाऱ्यासोबत घातलेल्या या गोंधळामुळे आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यातही घबराटीचे वातावरण पसरले हाेते. दरम्यान या प्रकरणी संताेष गजभारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पाेलीस ठाण्यात सदर बाधित तरूणाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.