नांदेडमधील अनधिकृत नळाविरुद्ध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:29 IST2018-06-27T00:29:00+5:302018-06-27T00:29:39+5:30
शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे.

नांदेडमधील अनधिकृत नळाविरुद्ध मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे.
शहरात एक लाखाहून अधिक मालमत्ता असताना ५४ हजार नळ कनेक्शन आहेत. प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे. त्यामुळे ५४ हजार अधिकृत नळ कनेक्शनव्यतिरिक्त असलेले अनधिकृत कनेक्शनचा शोध घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले. या आदेशानुसार महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, कार्यालय अधीक्षक राजेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता संदीप पाटील, अनिल जोशी, फेरोज खान, प्रभाकर कल्याणकर तसेच सहकाऱ्यांनी रेल्वेस्टेशन ते देगलूर नाका या भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनधिकृत नळ कनेक्शन घेवून चक्क मोटार सर्व्हीसिंग सेंटर चालवले जात होते. सरदार मेजरसिंघ हिरासिंघ यांच्या मालमत्तेमध्ये हे सेंटर सुरू होते. त्या सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे. हे सर्व्हीसिंग सेंटर पाच महिन्यांपासून सुरू असल्याचे घरमालकाने सांगितले. प्रत्यक्षात ते किती दिवसांपासून सुरू होते याचा महापालिकेकडून शोध घेतला जात आहे.
शहरात अनधिकृत नळकनेक्शन विरुद्ध मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे आयुक्त माळी यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अनेकदा अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेकडून मोहीम राबविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात मोहिमेला प्रारंभ झालाच नव्हता. मंगळवारी मात्र प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली. बुधवारपासून शहरातील अन्य भागातही अनधिकृत नळ जोडणीचा शोध घेतला जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.
---
मुख्य जलवाहिनीवरुनच अनधिकृत कनेक्शन
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वेस्टेशन ते देगलूरनाका या भागात मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या मुख्य जलवाहिनीला फोडूनच अनधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आले आहेत. याबाबत महापालिकेकडे माहिती मिळाल्यानंतर कारवाई हाती घेण्यात आली आहे. एकीकडे पाणी नियमित करण्याची मागणी होत असताना मनपाने आता अनधिकृत नळधारकांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.