आठवडी बाजारातून मोबाइल लंपास
नांदेड- किनवट शहरातील आठवडी बाजारातून चोरट्याने मोबाइल लंपास केला. ही घटना १ जानेवारी रोजी घडली. आदित्य मारोती खरे हा तरुण भाजीपाला खरेदी करीत असताना चोरट्याने त्याची नजर चुकवून नऊ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोयाबीन अन् तुरीचे पोते केले लंपास
मुखेड तालुक्यातील मौजे इटग्याळ येथे ओसरीत ठेवलेले तूर आणि सोयाबीनचे पोते चोरट्यांनी लंपास केले. ही घटना २ जानेवारी रोजी घडली. सुरेश भाऊराव पाटील हे कुटुंबासमवेत जेवण करून घरात झोपले होते. तर दोन्ही मुले ओसरीत झोपले होते. चोरट्याने रात्रीच्या वेळी १८ हजार रुपये किमतीचे तुरीचे पाच पोते आणि नऊ हजार रुपयांचे सोयाबीनचे चार पोते लंपास केले. याप्रकरणी मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
विवाहिता छळाच्या दोन घटना
नांदेड : पैशाच्या मागणीसाठी विवाहितेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाग्यनगर आणि माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
भाग्यनगर भागात राहणाऱ्या पीडितेचे भिवंडी येथे सासर आहे. माहेराहून पाच लाख रुपये आणावे यासाठी सासरकडील लोकांकडून मारहाण करण्यात आली. तर हेमलातांडा येथे पीडितेला व्यापार करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.