नांदेड हिंसाचाराबाबत भाजपाचे निवेदन; 300 जणांविरोधात गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 14:52 IST2021-11-13T14:46:33+5:302021-11-13T14:52:31+5:30
दंगलीबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जनांविरोधात गुन्हा दाखल.

नांदेड हिंसाचाराबाबत भाजपाचे निवेदन; 300 जणांविरोधात गुन्हे दाखल, अटकसत्र सुरू
नांदेड - नांदेड मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने सामंजस्याची भूमिका घेत बंदचे आवाहन न करता पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिले. कालच्या दंगलीतील सर्व आरोपीना अटक करावी, कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भाजपाच्या शिष्ट मंडळाने केली. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका घेणार असल्याचे भाजपाने सांगितले.
कालच्या दंगलीबाबत इतवारा पोलीस स्टेशनमध्ये 250 जणांवर कलम 307 आणि दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिवाजीनगर दगडफेक प्रकरणी 50 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी काही आरोपीना ताब्यात घेतले आहे. सध्या नांदेडमध्ये शांतता असून कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. जनजीवन पुर्वपदावर आले आहे. सीसीटीव्ही आणि इतर फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.
बंदला अचानक हिंसक वळण
त्रिपुरा येथे मुस्लीम बांधवांवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध मुस्लीम संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळपासून शांततेत असलेल्या बंदला दुपारी दोन वाजेनंतर मात्र हिंसक वळण लागले. देगलूर नाका परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. यावेळी दगडफेकीत अनेक दुकान आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. तर, काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले.