बोगस मजूर दाखवून कोट्यवधींवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:27+5:302021-02-05T06:10:27+5:30
नांदेड - भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने बोगस खाते उघडून ...

बोगस मजूर दाखवून कोट्यवधींवर डल्ला
नांदेड - भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने बोगस खाते उघडून शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आला आहे. २०१२पासून विनासायास हा प्रकार सुरु आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यापर्यंत तक्रारी गेल्यानंतर अखेर भोेकर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असाच काहीसा प्रकार मुखेड तालुक्यातही काही वर्षांपूर्वी झाला होता. चिदगिरी येथे आरोपी रमेश गुलाब चव्हाण आणि मनोज रघुनाथ चव्हाण या दोघांनी हा प्रताप केला आहे. ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगून त्यांचे आधारकार्ड घेतले. तसेच एका मशीनवर अंगठा घेतला. त्यानंतर राज्यात मुंबई येथे एकमेव शाखा असलेल्या आयडीएफसी बँकेत ग्रामस्थांच्या नकळत खाते उघडण्यात आले. अशाप्रकारे गावातील जवळपास दोन हजार जणांचे खाते या आरोपींनी उघडले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वत:च या मजुरांच्या नावे सीमकार्ड खरेदी केले. बँकेचे एटीएमही मिळवले. त्यानंतर या मजुरांची नावे मनरेगा आणि वन विभागाच्या कामाच्या यादीत टाकण्यात आली. मजुरांच्या खात्यात शासकीय योजनांची रक्कम जमा झाल्यानंतर एटीएमवरुन दहा हजार रुपये याप्रमाणे रक्कम आरोपी काढून घेत होते. अशाप्रकारे जवळपास दोन हजारांवर मजुरांची बोगस नोंद करुन त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आला. या प्रकरणाचा पाठपुरावा तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी केला. त्यांनी गृहमंत्र्यांपर्यंत याविषयी पत्रव्यवहार केला. त्यानंतर याप्रकरणी अखेर भोकर तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट - असा झाला प्रकरणाचा भांडाफोड
साहेब नारायण वाघमारे हे भोसी येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु, ती बँक बंद असल्याने ते मुदखेड येथे नेट बँकिंगद्वारे पैसे काढण्यासाठी गेले. यावेळी तेथील कर्मचाऱ्याने वाघमारे यांना तुमच्या नावे दोन खाती असून, कोणत्या खात्यातून पैसे काढायचे, अशी विचारणा केली. त्यामुळे वाघमारे हे बुचकळ्यात पडले. त्यांनी आयडीएफसीच्या दुसऱ्या खात्याची माहिती घेतली असता, त्या खात्यावर मनरेगा आणि वन विभागाच्या कामाचे ६५ हजार ११७ रुपयांची नोंद दिसून आली. यावेळी त्यांना रमेश चव्हाण आणि मनोज चव्हाण यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत वाघमारे यांनी गावात माहिती घेतली असता, नारायण वाघमारे, मधुकर चव्हाण, प्रदीप कंदेवाड, सुनीता एडके, गोविंद शहापुरे, विठ्ठल शहापुरे, अनुराधा शहापुरे यांच्यासह २३ जणांकडून रमेश व मनोज चव्हाण यांनी कागदपत्रे व अंगठा घेतल्याचे समोर आले.